फोटो पी ०९ अचलपूर फोल्डर
परतवाडा : केंद्रीय समितीच्या दौऱ्यात चांगले दाखवून स्वत:ची पाठ थोपटून घेण्याच्या केविलवाणा प्रयत्नात अचलपूर नगरपालिकेकडून शहरात रातोरात कंटेनमेंट झोन उभारले गेलेत. यात नागरिकांचे रस्ते अडवून नाहकच मार्ग बंद केल्या गेलेत.
अचलपूर डेडिकेटेट कोविड रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी आलेल्यांना सावली मिळावी म्हणून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून पांढरा शुभ्र शामियाना रात्रीतूनच उभारला गेला. कधी नव्हे एवढी स्वच्छता रुग्णालय परिसरात व लगतच्या वसतिगृहातील कोविड सेंटरला केल्या गेली. कोरोनाच्या अनुषंगाने डॉ.संजय रॉय आणि डॉ. अमितेश गुप्ता यांचे केंद्रीय पथक ९ एप्रिल रोजी शहरात दाखल झाले. हे पथक येण्यापूर्वी ८ एप्रिल रोजी शहरातील ब्राम्हणसभेसह गुरुकुल कॉलनीत रात्री उशिरा आणि पहाटे नगरपालिकेने प्रतिबंधित क्षेत्र उभारले. ब्राम्हणसभेतील सर्व मार्ग बंद करण्यात आले. ठिकठिकाणी बासे बल्ल्या बांधल्या गेल्यात. नवे कोरे प्रतिबंधित क्षेत्र अंकित असलेले फलक त्यावर लावल्या गेलेत. हे बासे बल्ल्या बांधण्याकरिता सुतळी, दोरी ऐवजी कापडी चिंध्या बांधल्या गेल्यात.
केंद्रीय समितीचे पथक येणार म्हणून उघडी दुकाने, पानठेले, हॉटेल बंद करण्याच्या सूचना देण्याचा सपाटाच नगरपालिकेकडून सकाळपासून लावण्यात आला. पण याचा कुठलाही परिणाम गर्दीवर, मार्केटवर, मास्क न लावणाऱ्यांवर, दुकानदारांवर झाला नाही. या समितीच्या दौऱ्यादरम्यान शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. दुकाने उघडे होती. ही परिस्थिती डोळ्याने दिसू नये, म्हणून पालिकेने पथकाला शहराच्या आतून, मार्केटमधून जाऊच दिल्या गेले नाही.
दोन ठिकाणी भेटी
केंद्रीय समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत डेडिकेटेड कोविड रुग्णालयाला भेट दिली. तेथून त्यांनी देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत बालाजी नगरला भेट दिली. आरोग्य यंत्रणेकडून उपाययोजना जाणून घेतल्यानंतर त्यांनी सरळ सर्किट हाऊस गाठले. सर्किट हाऊसवरून ते सरळ परतीच्या मार्गी लागले.
मुख्याधिकाऱ्यांकडून प्रतीक्षा
नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांसमवेत दुपारी २.३० पर्यंत ब्राम्हणसभेच्या तोंडावर पथकाची वाट पाहत उभ्या होत्या. पण पथक तेथे पोहचलेच नाही. हे पथक कांडलीच्या दिशेनेही वळले नाही. केंद्रीय पथकाच्या अनुषंगाने रातोरात नगरपरिषदेकडून उभारले गेलेले कंटेनमेंट झोन, बासे बल्ल्या नागरिकांनी काही ठिकाणी चक्क काढून फेकलेत.
बॉक्स
फायर ब्रिगेडचा गैरवापर
या केंद्रीय पथकाच्या दौºयादरम्यान अचलपूर नगरपालिकेची फायर ब्रिगेडची छोटे नवे कोरे वाहन फायर आॅफिसरने शहरात फिरवले. गणवेश परिधान न करता अगदी खाजगी फिरतात तशी ते वातानुकुलीत वाहन त्यांनी शहरात फिरविले. फायर ब्रिगेडचे वाहन अग्निशमनाव्यतिरिक्त अन्य कामी फायरस्टेशनच्या बाहेर काढताच येत नाही. यात नगर पालिकेकडून फायरब्रिगेडच्या गाडीचा गैरवापर केल्या गेला. दरम्यान मुख्याधिकाºयांच्या आदेशान्वये दुकाने बंद करण्याकरिता शहरात फिरविल्याचे फायर आॅफिसर जोगदंड यांचे म्हणणे आहे. तर नगरपालिकेकडे पुरेशी वाहन नसल्याने ते वाहन फिरविल्याची माहिती मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी दिली.