अमरावती : येथील आरटीओ कार्यालय ते पंचवटी चौकादरम्यान रस्ते बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याप्रकरणी गुरुवारी महापालिका शहर अभियंत्यानी हे रस्ते बांधकाम रोखले. एवढेच नव्हे तर माती मिश्रीत गिट्टी ताब्यात घेऊन सदर कंत्राटदारांना नोटीस बजावली.शासनाच्या नगरोत्थान अंतर्गत पावणेतीन कोटी रुपयांतून आरटीओ ते पंचवटी चौकादरम्यान रस्ते निर्मितीचा कंत्राट एस. एल. खत्री यांना ई- निविदा प्रक्रियेअंती सोपविण्यात आला आहे. मात्र आ. सुनील देशमुख यांनी रस्ते निर्मिती अथवा विकास कामे ही निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप केला. त्यानुसार काही विकास कामांच्या स्थळी आ. देशमुख यांनी भेट देत साहित्य ताब्यात घेण्याची शक्कल लढविली. नागरिकांच्या आरोपानुसार विकास कामांत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचे भेटीअंती स्पष्ट झाले. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाने कंत्राटदारांना धडा शिकविण्यासाठी धाडसत्र सुरु केले. ज्या स्थळी विकास कामे सुरु आहेत, अशा विकास कामांना भेटी देण्याचे महापलिका अभियंत्यांनी ठरविले आहे. त्यानुसार गुरुवारी शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांच्या चमुने येथील आरटीओ कार्यालय ते पंचवटी चौक दरम्यान सुरु असलेल्या रस्ते निर्मिती बांधकाम स्थळी भेट दिली असता माती मिश्रीत गिट्टी वापरली जात असल्याचे निदर्शनास आले. परिणामी संबंधित कंत्राटदाराला साहित्य चांगल्या दर्जाचे वापरण्याची ताकीद देण्यात आली. या रस्ते बांधकामात डांबर वापराचे प्रमाणही अत्यल्प असल्याने अभियंत्याच्या म्हणण्यानुसार डांबर वापरण्यात आले नाही तर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली जाणार असे नोटीसमध्ये नमूद आहे. महापालिका अभियंता चमुने विकास कामांत वापरल्या जात असलेल्या साहित्याची तपासणी सुरु केल्याने कंत्राटदारांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरताना कोणी कंत्राटदार आढळल्यास त्याच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे संकेत आहेत. साहित्य तपासणी मोहीम शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांच्या मार्गदर्शनात तायडे, मुकुंदा राऊत, प्रमोद इंगोले आदी अभियंत्यांनी सुरु केली आहे. (प्रतिनिधी)
आरटीओ ते पंचवटीदरम्यान रस्त्यांचे बांधकाम रोखले
By admin | Updated: January 8, 2015 22:48 IST