स्थायी समितीचा वाद : आसिफ तवक्कल, हिवसे यांची नावे निश्चितअमरावती : महापालिकेत काँग्रेसमध्ये स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरून सुरू असलेल्या महाभारतावर पडदा टाकण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार, आ. विजय वडेट्टीवार आणि रामकृष्ण ओझा यांनी रविवारी काँग्रेस नगरसेवकांसोबत बंदद्वार चर्चा करून मते जाणून घेतली. ही मते जाणून घेताना निरीक्षकांनी स्थानिक नेत्यांना ‘दूर’ ठेवण्याची रणनीती आखली, हे विशेष. मात्र, स्थायी समितीत बबलू शेखावत, आसिफ तवक्कल, अरुण जयस्वाल व प्रदीप हिवसे या चार सदस्यांपैकी दोन नावे पाठविण्याचा निर्णय झाल्याचे आ. वडेट्टीवार यांनी सांगितले.महापालिकेत स्थायी समितीत नावांची नियुक्ती करण्यासाठी काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच मोठे घमासान सुरू आहे.‘स्थायी’वरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद, शेखावत बंधुंमध्ये नाराजी, नगरसेवकांमध्ये कुरघोडीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून आले. स्थायी समितीमध्ये काँग्रेसला दोन नगरसेवकांची नियुक्ती करावयाची होती. काँग्रेसमधून दोन नावे निश्चित करताना काँग्रेस व्यतिरिक्त गटातील कांचन डेंडुले यांचे नाव निश्चित केल्यामुळे काँग्रेसमध्ये असंतोष उफाळून आला होता. मात्र, पक्षनेता बबलू शेखावत, स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांनी तात्पुरता तोडगा काढला होता. याप्रकरणामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी लक्ष घातले. त्यानुसार रविवारी आ. वडेट्टीवार, रामकृष्ण ओझा यांनी काँग्रेस नगरसेवकांसोबत बंदद्वार चर्चा केली. वृत्तलिहेस्तोवर काँग्रेसमधून आसिफ तव्वकल, प्रदीप हिवसे यांची नावे स्थायी समितीत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.सामाजिक ‘बॅलेन्स’नुसार नाव निश्चित- वडेट्टीवारकाँग्रेसमध्ये सामाजिक दृष्ट्या निर्णय घेण्याची परंपरा आहे. त्यानुसार स्थायी समितीत सदस्य म्हणून नावे निश्चित करताना सामाजिक ‘बॅलेन्स’ नुसार नावे ठरविल्याचे आ. विजय वडेट्टीवार म्हणाले. कांचन डेंडुले यांचे नाव पूर्वी ठरविण्यात आले होते. मात्र, त्यांचे नाव काँग्रेमधून पाठविणे सांयुक्तिक नव्हते. मतभेद टाळण्याकरिता संधी न मिळालेल्या नगरसेवकांना स्थायी समितीत न्याय देण्याची भूमिका घेतली, असे आ.वडेट्टीवार म्हणाले.करारनाम्याची अंमलबजावणी व्हावी- संजय खोडकेमहापालिकेत काँग्रेस पक्षात स्थायी समितीमध्ये दोन सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी सुरू असलेला वाद थेट प्रदेश काँग्रेसकडे गेला. मात्र, सत्ता वाटपाचे सूत्र ठरविताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमध्ये झालेल्या करारनाम्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची भूमिका काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके यांनी घेतली आहे. करारनाम्यानुसार राष्ट्रवादी फ्रंटच्या वाट्याला स्थायी समिती सभापतीपद आहे. त्यामुळे पद न मिळाल्यास राष्ट्रवादी गटासोबत अन्याय होईल, असे खोडके म्हणाले.सभापतिपदाची निवडणूक ५ मार्च रोजीस्थायी समिती सदस्य नियुक्तीची प्रक्रिया सोमवार २९ फेब्रुवारी रोजी होत आहे. ५ मार्च रोजी स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक होईल. या निवडणुकीत आ.वडेट्टीवार हेच निरीक्षक म्हणून येतील, हे निश्चित आहे. मात्र, सभापती कोणत्या गटाचा होणार, हे ५ मार्चनंतरच स्पष्ट होईल.
काँग्रेस निरीक्षकांची बंदद्वार चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 00:11 IST