अमरावती : गत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चार जागांवर विजय प्राप्त करणाऱ्या काँग्रेसला यंदा विरोधी लाटेमुळे नुकसान सहन करावे लागले. केवळ दोनच जागांवर काँग्रेसला विजय मिळविता आला. जिल्ह्यात काँग्रेसला तिवसा आणि धामणगाव रेल्वे या दोनच मतदारसंघात यश मिळविता आले. प्रचारादरम्यान काँग्रेसच्या मोठ्या नेतृत्वातील कोणतीही येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरकले नाहीत. आघाडी शासनाने घेतलेल्या काही निर्णयामुळे हिंदी भाषिक आणि व्यावसायिकांनी काँग्रेसकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या तुलनेत भाजप, सेनेने प्रचारात मोठी आघाडी घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आदी भाजप, सेनेच्या नेत्यांनी अमरावतीत ठिय्या मांडला होता. दरम्यान मनसेचे राज ठाकरे यांनी सुद्धा जिल्हा पालथी घातला. मात्र काँग्रेसची कोणतीही सेलिब्रिटी उमेदवारांच्या प्रचारासाठी मदतीला धावून आली नाही. निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्या उमेदवारांनी स्वबळावर किल्ला लढविला. मतदारांपर्यंत विकासकामे पोहचविली. मात्र मोदी लाटेपुढे काँग्रेसने केलेली विकासकामे टिकाव धरु शकली नाही. भाजपने चार जागांवर विजय मिळविला. यावेळी निवडणुकीत काँग्रेसला ४ ते ५ जागा जिंकण्याची आशा होती. मात्र निकालानंतर ही आशा धुळीस मिळाली आहे. राज्यात १५ वर्षे आघाडी शासन होते. नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप भोवले.
काँग्रेसला दोन जागांचे नुकसान
By admin | Updated: October 19, 2014 23:13 IST