अमरावती : शहरापासून जवळच असलेल्या सुकळी येथे महापालिकेच्या कंपोस्ट डेपोसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या. मात्र तुटपुंज्या मोबदल्यामुळे कृती समितीने कंपोस्ट डेपोला तीव्र विरोध केला आहे त्यामुळे आता हा मुद्दा चांगलाच ताबला आहे.मंगळवारी सकाळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील कचरा घेऊन आलेले वाहन रोखून आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान आंदोलनकर्त्यांची आमदार सुनील देशमुख यांनी भेट घेऊन त्यांच्या मागणीसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन येथे निवळले. महापालिका प्रशासनासोबत सोमवारी कपोस्ट डेपोविरोधी कृती समितीच्या संयुक्त बैठकीतील चर्चा फिस्कटल्यामुळे कृती समितीने प्रकल्प स्थळी मंगळवारी सकाळपासूनच ठिय्या दिला होता. याचवेळी शहरातील कचरा घेऊन येणारे वाहने रोखून धरत शहरात पुन्हा परतून लावली. त्यामुळे या परिसरात कचरा घेऊन येणाऱ्या वाहनांना आंदोलनामुळे जाता आले नाही. अखेर कृती समितीचे प्रवीण हरमकर, बबन रडके यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्त शेतकरी व परिसरातील नागरिकांनी रॅली काढून याविरोधात घोषणाबाजी केली आणि महापालिकेने जमीन हडपल्याची माहिती आंदोलनकर्त्यांना नागरिकांना दिली. यामुळे कंपोस्ट डेपोविरोधात परिसरात आक्रमक पवित्रा घेतला. आंदोलनकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता आमदार सुनील देशमुख यांनी सुकळी येथील कंपोस्ट डेपो येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी सुद्धा पोहोचून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यासंदर्भात महापालिका व शासनामार्फत शेत जमिनीचा मोबदला वाढवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिल्यामुळे सकाळी सात वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी साडेबारा वाजता मागे घेण्यात आले. आंदोलनात गफ्फार राराणी, मधुकर खारकर, विलास पवार, आशीष अतकरे, शकील आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)
कंपोस्ट डेपोचा मुद्दा तापला; कचऱ्याचे वाहन रोखले
By admin | Updated: February 11, 2015 00:26 IST