क्रूरकर्मा सुधाकरला अटक : नरबळीचा थरार नरेंद्र जावरे परतवाडा‘मै कसाईबाबा हूं , मैंने देवी को अपने बच्चों की बली देकर नवस पुरा किया’ चेहऱ्यावर गुन्ह्याचा कुठलाही लवलेश नसणाऱ्या आणि स्वत:ला बाबा म्हणविणाऱ्या क्रुरकर्म्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याने उद्गारलेले हे वाक्य उपस्थितांचे डोके सुन्न करणारे ठरले. रविवारी आपल्या दोन मुलांचे कुऱ्हाडीने मुंडके छाटून हत्या करणाऱ्या आरोपी सुधाकरला मंगळवारी खडीमल येथील शेतातून अटक करण्यात आली त्यानंतर चिमूरडयांच्या हत्येचा खुलासा झाला. चिखलदरा तालुक्यातील खडीमल येथे दिवाळीच्या दिवशी सुधाकर भाऊ सावलकर (२९) याने आपल्या आतिष (६) व आकाश (८) या दोन चिमुकल्यांना अत्यंत निर्दयीपणे डोलारदेव जंगलाच्या तिनशे फुट खोल दरीत नेवून त्यांची हत्या केली होती. त्यानंतर तो पसार झाला होता. दिवाळी अमावस्याचा दिवस असल्याने अंधश्रद्धेने पिसाळलेल्या सुधाकरच्या मनात अनेक दिवसापासून हा विचार सुरु असल्याचे त्याने प्राथमिक चौकशीत पोलिसांना सांगितले.कसायाला लाजवेल असे निर्दयी कृत्य करणारा सुधाकर सावलकर स्वत:ला कसाईबाबा म्हणवतो. त्याच्याजवळ देवी देवतांची पुस्तके आढळून आली. तर शेतात पाच प्रकारचे खाद्यान्न चिवडा, खारिक, बादाम, निंबू आढळून आले. अंधश्रद्धेचे भूत त्याच्या डोक्यात शिरल्याचे बोलण्यातून जाणवत होते. एक वर्ष त्याने देवीची पूजा केल्यावर दोन वर्ष खंड पडला आणि आपल्या दोन्ही मुलांचा नवस देण्याचा मनोदय करीत हा अत्यंत निर्दयी प्रकार त्याने केला. आतिष आणि आकाशच्या मानेवर आणि गालावर कुऱ्हाडीचे खोलवर घाव करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात ते स्पष्ट झाले आहे.मंगळवारी चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सैय्यद व सहकारी अरविंद टाले यांनी शवविच्छेदन केले. आरोपी सुधाकर हा मुलांना डोलारदेव बाबा जंगलातील खोल दरीत घेवून गेला. तेथे दोघांना उभे केले आणि मान खाली करायला लावल्या. दोन्ही लहानग्यांनी वडीलांचा आदेश पाळला. त्यांनी डोके जमिनीचे दिशेने केल्या बरोबर सुधाकरने कुऱ्हाडीने वार करुन त्यांची अमानुष हत्या केली. मोठा एकाच घावात यमसदनी पोहचला.तर लहानग्या आतीषच्या मानेवर त्याने तीन वार केले. दोघेही कोसळल्यावर पुन्हा दोघांच्या गालावर प्रत्येकी एक वार करुन त्याने ते मृतदेह आपटयाच्या पानाने झाकून ठेवले.ही हत्या आपणच केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. अंधश्रद्धाविरोधी कायद्यान्वये गुन्हापरतवाडा : चिखलदरा पोलिसांनी आरोपी सुधाकर सावलकर विरुद्ध हत्या करुन करावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला असून आता त्याच्या बयाणावरुन अंधश्रद्धेचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे ठाणेदार नरेश पारवे यांनी सांगितले. परिसरात संताप : आदिवासीमध्ये मोठ्या प्रमाणात नवस फेडण्याची प्रथा आहे. त्यासाठी बोकड, कोंबडेचा बळ दिला जातो. परंतु स्वत:ला कसाईबाबा म्हणत पोटच्या गोळ्याचे मुंडके छाटून देवीसह ब्रम्ह विष्णू महेशला खुश करणाऱ्या सुधाकर सावलकर विषयी परिसरात तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. त्याला सुद्धा मृत्युदंडाची शिक्षा तत्काळ ठोठावण्याची मागणी होवू लागली आहे. सोमवारी घटनेची माहिती मिळताच मेलघाटचे माजी आमदार केवलराम काळे, कॉँग्रेसचे अध्यक्ष मिश्रीलाल झारखंडे यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून विविध स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लक्ष देणे गरजेचे वाटू लागले आहे.ज्वारीचे कणस खात होता भाजून हत्यारा सुधाकर उर्फ कसाईबाबाने दिवाळीच्या दिवशी स्वत:च्या दोन्हीं मुलांची क्रूरतेने हत्या केल्यावर तो पसार झाला होता. खडीमल गाव जंगलात तो लपला . अमरावती येथील गुन्हे शाखेसह चिखलदरा पोलिसांनी त्याला दोन दिवसानंतर मंगळवारी गावालगतच्याच शेतातून अटक केली. तेव्हा सुधाकर ज्वारीचे कोवळे कणीस भाजून खात होता. पोलिसांना बघताच त्याना पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली.
पोटच्या गोळ्यांचे शिर छाटून नवसपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 00:11 IST