अमरावती विद्यापीठाचा अजब-गजब कारभार, गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पडला विसर
अमरावती : महाविद्यालयांना दीक्षांत समारंभाची सक्ती करणारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गुणवंत विद्यार्थ्यांना मात्र काऊंटरवर उभे करून ३१ जुलै रोजी पदके व पारितोषिकांचे वितरण करणार आहे. विद्यापीठाच्यावतीने ना सोहळा, ना कौतुक, रांगेत या आणि पदके घेऊन जा, या आशयाचे पत्र जारी करण्यात आले आहे. त्यामुळे गुणवंतांच्या गुणवत्तेचा जणू विद्यापीठाला विसर पडल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे ‘नॅक’ मूल्यांकनासाठी अधिकारी जोमाने तयारी करीत असल्याचे चित्र आहे.
विद्यापीठात कोरोनाचा बागुलबुवा करणारे अधिकारी हे अलीकडे सेवानिवृत्तांचा निरोप समारंभ आणि वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यात गर्दी झाली तर चालते, मात्र कोरोना नियमांचे पालन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करावा, यासाठी कुलगुरू, कुलसचिव, प्र-कुलगुरूंना वेळ नाही, असा कारभार सुरू आहे. त्यामुळेच पदके व पारितोषिकांचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांना पत्र पाठविले आणि काऊंटरवर पदके व पारितोषिकांचे वितरण होणार, असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. ज्या गुणवंतांनी पाच ते सहा सुवर्णपदके, रौप्यपदके मिळविली, त्यांचा गौरव न करता केवळ काऊंटवर पदके वितरण करणे ही बाब त्या विद्यार्थ्यांसाठी क्लेषकारक आहे. विशेषत: पदके, पारितोषिकांच्या वितरणाबाबत प्रसिद्धी माध्यमांना दोन हात दूरच ठेवले आहे. पीएचडीपेक्षाही उच्च कर्तृत्व सिद्ध करणारे गुणवंत मात्र विद्यापीठाच्या या स्वार्थी व आडमुठ्या धोरणासमोर हतबल झाल्याचे वास्तव आहे. मुख्य म्हणजे, या न होणाऱ्या समारंभाची प्रभार असलेल्या विद्यमान कुलगुरूंना काहीच खबरबात नसल्याची चर्चा आहे. दीक्षांत समारंभाचा राहिलेला भाग उरकून टाकावा, या भावनेने सुवर्ण व रौप्य पदके ‘वाटपा’चा हा कार्यक्रम होणार आहे. विद्यापीठातील गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना गुणवत्तेशी काहीच घेणे देणे नसल्याचे पुनः सिद्ध झाले आहे.
-------------
कोरोना संसर्गामुळे दीक्षांत सोहळा घेता येणार नाही, हा निर्णय अगोदर झाला आहे. ३१ जुलै रोजी पदके, पारितोषिकांचे वितरण विद्यार्थ्यांना काऊंटरवरून करण्यात येणार आहे.
- तुषार देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
----------------
सुवर्ण, रौप्य पदके मिळविण्याचा क्षण हा मोजक्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येतो. त्यामुळे सभागृहात नियमांचे पालन करून गुणवंताचे कौतुक विद्यापीठाने करायलाच पाहिजे. अशा गुणवंताची संख्या बोटावर मोजण्याएवढीच असते. महाविद्यालयांना पदवी वितरणाची सक्ती कशासाठी केली जाते, यामागील कारण जाणून घेणेदेखील महत्त्वाचे आहे.
- प्रवीण रघुवंशी, अध्यक्ष, नुटा संघटना, अमरावती.