लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परीक्षा, निकाल, नामांकन आदी शैक्षणिक बाबींविषयीच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात तीन वर्षांपूर्वी समन्वयकपदांची निर्मिती करण्यात आली. मात्र, परीक्षेशी निगडित विषयांवर समन्वयक म्हणून काम पाहणारे प्राध्यापक अपयशी ठरले आहे. परिणामी महाविद्यालयातून हे पद रद्द करण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे.महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांचे परीक्षेशी निगडित कामे होत नसल्याने हे विद्यार्थी विद्यापीठाकडे धाव घेतात. त्यामुळे नाईलाजास्तव विद्यार्थ्यांना विद्यापीठ गाठून कामे करावी लागतात. यात विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, वेळदेखील व्यर्थ जातो. परिणामी सिनेट सभेत तीन वर्षांपूर्वी विद्यापीठ व महाविद्यालय यांच्यात परीक्षेशी निगडित कामकाजाबाबत प्रत्येक महाविद्यालय स्तरावर एका समन्वयकाची नियुक्ती करण्याचा निर्णय अधिसभेत घेण्यात आला. त्यानुसार समन्वयकपदावर कार्यरत व्यक्तीला दरवर्षी पाच हजार रूपये मानधनसुद्धा देण्यात आले. कालातंराने हे पद मानधनापुरते मर्यादित राहिले, ही बाब बीओयूने बैठकीत चर्चेदरम्यान स्पष्ट केली. महाविद्यालय स्तरावर परीक्षा, निकाल, हॉलतिकीट, नामांकन क्रमांक आदी विद्यार्थ्यांशी निगडित बाबी कमी होण्याऐवजी यात वाढ झाली. महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना समन्वयकाकडून मार्गदर्शन मिळत नसल्याच्या तक्रारीसुद्धा विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या. समन्वयक पदाची निर्मिती ज्या हेतूने झाली, यात विद्यापीठाला कोणताही लाभ झाला नाही. त्यामुळे ३८२ महाविद्यालयांत असलेल्या समन्वयकांची निवड रद्द करण्याचा निर्णय बीओयू मंडळाचे अध्यक्ष कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी घेतला आहे.तीन वर्षांत १६१ समन्वयकांना मानधनअमरावती विद्यापीठाने सन २०१५ पासून प्रत्येक महाविद्यालयात समन्वयक पदाची नियुक्ती केली आहे. दरवर्षी पाच हजार रूपये मानधन देण्यात आले. यात सन २०१५-२०१६ मध्ये ९२ समन्वयक, सन २०१६-२०१७ मध्ये ३० तर सन २०१७-२०१८ मध्ये ३९ समन्वकांना मानधन देण्यात आले आहे. आता येत्या शैक्षणिक सत्रापासून महाविद्यालयात समन्वयक पद असणार नाही.
३८२ महाविद्यालयांतून समन्वयकपद रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 01:13 IST
परीक्षा, निकाल, नामांकन आदी शैक्षणिक बाबींविषयीच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात तीन वर्षांपूर्वी समन्वयकपदांची निर्मिती करण्यात आली. मात्र, परीक्षेशी निगडित विषयांवर समन्वयक म्हणून काम पाहणारे प्राध्यापक अपयशी ठरले आहे.
३८२ महाविद्यालयांतून समन्वयकपद रद्द
ठळक मुद्देपरीक्षा व मूल्यमापन मंडळाचा निर्णय : कुचकामी ठरल्याचा ठपका