मध्यरात्री अवैध रेती खाली करताना अपघात, वाहनाला दिशा दाखविताना झाली चूक, चालक पसार
चांदूर बाजार : शहरतील गुलजारपेठ परिसरात अवैध रेतीचा मिनी ट्रक खाली केल्यानंतर रात्रीच्या अंधारात साईड दाखवित असताना भिंत व वाहन यांच्यात दबून क्लीनरचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. चालक-मालक जावेद खान जमीरउल्ला खान यांच्या हलगर्जीपणामुळे अपघात घडल्याची तक्रार मृताच्या चुलतभावाने चांदूर बाजार पोलीस ठाण्यात
नोंदविली. याप्रकरणी चालक पसार झाला आहे. पोलीस सूत्रांनुसार, अमर ऊर्फ ऋषभ सुभाष शेकोकार (२५, रा तळेगाव मोहना) असे मृताचे नाव आहे. चांदूर बाजार शहरातील गुलजारपेठ परिसरात रात्री साडेतीन वाजता अपघात घडला. तालुक्यातील जावेद खान जमीरउल्ला खान (४०, रा. काजीपुरा) याचा अवैध रेतीविक्रीचा व्यवसाय आहे. रात्रीच्या अंधारात रेतीचा साठा केला जातो. त्याच्याकडे अमर हा काम करीत होता. २८ जानेवारीला रात्री १० वाजता जावेद हा तळेगाव मोहना येथे आला आणि त्याच्या मिनी ट्रक (एमएच ०४ - ४०८४) मध्ये अमरला घेऊन गेला. त्याने रात्री साडेतीनच्या सुमारास मिनी ट्रकमधून रेती रिकामी केली. केली. वाहन काढताना अमर हा त्याला साईड दाखवत होता. यावेळी भिंत व वाहन यांच्यात दबून अमरचा घटनास्थळीच मरण पावला. घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी वाहन जावेद खान चालवित असल्याचे सांगितल्याचे मृतकाचा भाऊ अक्षय विलासराव शेगोकार यांनी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद केले. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी भादंविचे कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला. मिनी ट्रक ताब्यात घेण्यात आला असून, जावेद खान पसार झाला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार सुनील किणगे यांचा मार्गदर्शनात होत आहे.