अमरावती : खरेदीदाराने अडत्यांचे धान्य खरेदी करून त्यांना वेळेत पैसे परत केले नाही. अशाप्रकारे बाजार समितीतील २३ अडत्यांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारा रिद्धी ट्रेडर्सचा खरेदीदार निरंजन बोहरा याच्याविरुद्ध अडत्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी एप्रिल महिन्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. कोट्यवच्च्या या प्रकरणाचा तपास दहा दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
याप्रकरणी अडते शशांक हिवसेसह २३ जणांनी बजार समितीच्यावतीने गाडगेनगर ठाण्यात संयुक्त तक्रार नोंदविली होती. त्यापूर्वी त्यांनी बाजार समिती सभापती व सचिव यांच्याकडेसुद्धा फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविली होती. बाजार समितीने निरीक्षक के.पी. मकवाणे यांच्यामार्फत प्रकरणाची चौकशी केली. या प्रकरणात तथ्य आढळून आल्याने पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. आता सदर प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी खरेदीदाराला नोटीस बजावल्याची माहिती आहे.
कोट
रिद्धी ट्रेडर्सच्या खरेदीदाराने फसवणूक केल्याची तक्रार बाजार समितीला प्राप्त झाली होती. त्यानुसार चौकशीअंती २३ अडत्यांनी गाडगेनगर पोलिसांत संयुक्त तक्रार नोंदविली होती. याप्रकरणी सदर गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग असल्याची माहिती आहे.
- के.पी मकवाणे, निरीक्षक, बाजार समिती, अमरावती