अमरावती: देशभरात २ आॅक्टोबर रोजी सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाला राज्यात व्यापक स्वरूपात गती देण्यासाठी राज्यपाल विद्यासागर राव यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांशी व्हिडीओ काँफरन्सव्दारे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात संवाद साधून विविध योजनाची माहिती जाणून घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून देशभरात स्वच्छ भारत अभियानाला सुरूवात केली. या उपक्रमाला व्यापक स्वरूपात गती देण्यासाठी राज्यातही विशेष भर देण्यात येत आहे. या पाश्वभुमीवर राज्यपाल विद्यासागर राव यांनीही लक्ष केंद्रीत केले आहे. विधानसभेच्या धामधुमीत स्वच्छभारत अभियानावर विविध शासकीय कार्यालयात पाहिजे त्या प्रमाणात अधिकाऱ्यांनाही लक्ष देता आले नाही. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीची लगबग आटोपली आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दर मंगळवारी कार्यालयात स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी मंगळवारी अमरावतीसह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हिडीओ काँफरन्सव्दारे संवाद साधून स्वच्छ भारत अभियान, पेसा कायदा, तसेच इतर शासकीय योजनाचाही लेखाजोखा जाणून घेतला. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत. राज्यपाल यांच्या व्हिडीओ कॉंफरन्सला विभागीय आयुक्त ज्ञानेश्र्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापालिका आयुक्त अरूण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी आदीची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
राज्यपालांनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास
By admin | Updated: October 21, 2014 22:43 IST