रणधुमाळी : नेते लागले कामाला, अनेक इच्छुक मैदानातदर्यापूर : आदर्श आचारसंहिता लागू होताच नेते खऱ्या अर्थाने कामाला लागले आहे. पालिकेच्या निवडणुकीचे जरी कुठल्याही पक्षाचे उमेदवार अधिकृतरित्या जाहीर झाले नसले तरी, सर्वपक्षीय नेते कामाला लागले आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे या प्रमुख पक्षांचे उमदेवार रिंगणात उतरणार आहेत. होऊ घातलेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष जनतेतून निवडून द्याव्याचे असल्याने दर्यापूरचा भावी नगराध्यक्ष कोेण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सक्षम उमेदवार शोधण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांची दमछाक होत आहे. दर्यापूर नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसचे ११, भाजपा २, नगरसुधार समिती ६ व बहुजन विकास आघाडी १ असे नगरपालिकेचे पक्षीय बलाबल आहे. गत निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढविली होती. पण शिवसेनेला तेव्हा माजी आमदार अभिजित अडसूळांच्या नेतृत्वात खातेही उघडता आले नव्हते. परंतु या वेळेस शिवसेनाही सर्व ताकदीनिशी उमेदवारांना रिंगणात उतविणार आहे. यावेळीस १० प्रभाग राहणार प्रत्येक प्रभागात दोन उमेदवार राहणार आहेत. त्यामुळे उमेदवार निवडून येण्यासाठी बाजी लावावी लागणार आहे. आ. प्रकाश भारसाकळे व आ. रमेश बुदिंले यांच्या नेतृत्वात भाजपा २० उमेदवार उभे करणार आहे. काँग्रेसची धुरा जिल्हा बँकेचे संचालक तथा काँग्रेसचे नेते सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या खांद्यावर राहणार आहे. ते स्वत:च काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहणार आहे. तसे यापूर्वीच जाहीरही करण्यात आले आहे. अकोटचे आमदार तथा दर्यापूरचे माजी आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकळे ह्या नगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत. या निवडणुकीत नगराध्यक्षपद सर्वसाधारणकरिता राखीव असल्याने भाजपाच्या नलिनी भारसाकळे नगराध्यक्षपदाचा नवा चेहरा असून शकतो. आतील गोटातून तसे संकेतही प्राप्त झाले आहे. पण अद्याप तरी भाजपाची नगराध्यक्षपदाचा अधिकृत उमेदवार जाहीर झाला नाही. शिवसेना पक्षही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत आहेत. माजी नगराध्यक्ष अशोकसिंग गहरवार यांच्या निधनानंतर नगरसुधार समितीला कुणीही नेता उरला नसल्याने निवडणुकीत नगरसुधार समितीचे उमेदवार राहणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अरुण पाटील गावंडे हे काँग्रेसशी हातमिळविणी करू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने राजकीय जाणकारांचे लक्षही लागले आहे. नामाकंन अर्ज उचलण्यासाठी केवळ चार दिवस राहले आहे. त्यामुळे वेळेवर कोण कुणाशी युती करते? व कोण वेगळी चूल मांडते ? हे तर वेळेस सांगणार आहे. या गतनिवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले होते. परंतु दोन उमेदवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. त्यामुळे बहुजन विकास आघाडीही काही प्रभागात उमेदवार उभे करणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण करिता निघाल्याने यापदाकारिता उमेदवारांची भाऊगर्दी राहणार आहे. निवडून येण्यासाठी रस्सीखेच होणार आहे. जिल्ह्यात दर्यापूर नगरपालिका हे महत्त्वाची मानली जाते. जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारा निर्णयात्मक दर्यापूर तालुका असल्याने अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीला रंग चढायला आतापासूनच सुरुवात झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
दर्यापूर पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी चुरस
By admin | Updated: October 22, 2016 00:13 IST