वनोजाबाग (अंजनगाव सुर्जी) : भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. येथील काठीपुरा भागात शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. चिमुकलीच्या मृत्यूनंतर काठीपुरा भागात तणाव निर्माण झाला आहे. तन्नू उमेश मांडवे (४, काठीपुरा, अंजनगाव सुर्जी), असे मृत चिमुकलीचे नाव आहे.
शनिवारी दुपारी तन्नू ही तिचे काका प्रमोद मांडवे यांच्या काठीपुऱ्यातील घरी गेली. तेथून परतत असताना एमएच २७ बीव्ही ०६४७ या चारचाकी वाहनाने तिला धडक दिली. या अपघातात चिमुकलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनास्थळाचे दृश्य अतिशय हृद्यद्रावक व थरारक होते. काही समजण्याच्यापूर्वीच चालकाने वाहनासह पळ काढला. काठीपुऱ्यात हाहाकार उडाला. आरोपी वाहनचालकाला अटक करून जोपर्यंत काठीपुऱ्यात आणले जात नाही, तोपर्यंत चिमुकलीचा मृतदेह आम्ही घेणार नाही, अशी भूमिका मांडवे कुटुंब व काठीपुऱ्यातील नागरिकांनी घेतली. घटनास्थळी अंजनगाव पोलीस पोहोचले असून, वृत्त लिहिस्तोवर कुटुंबीयांनी चिमुकलीचे शव ताब्यात घेतलेले नव्हते.