लोकमत विशेषवैभव बाबरेकर अमरावतीमुलाने झिडकारले, वृध्दाश्रमात टाकले. वृध्द भगवंत सातपुते यांना वृध्दाश्रमात आधार घ्यावा लागला. पण, तेथेही त्यांची फरफट थांबली नाही. प्रकृती बिघडली. परंतु त्यांना रूग्णालयात आणण्याची तसदी वृध्दाश्रम व्यवस्थापनाने घेतली नाही. शेवटी या वृध्दाला स्वत:चा इर्विन रुग्णालयात यावे लागले. मात्र, इर्विनच्या प्रवेशद्वारावर ताटकळत राहणे त्यांच्या नशिबी आले. शिरजगाव कसबा येथील रहिवासी भगवंत श्रावण सातपुते (७०) हे दोन वर्षांपासून शहरातील एका वृध्दामश्रात राहात आहेत. त्यांना एक मुलगा असून तो अमरावती विद्यापीठाचा कर्मचारी आहे. मात्र, म्हातारपणी त्यांना वृध्दाश्रमात रहावे लागते. मुलाने जबाबदारी नाकारल्याने त्यांच्यावर ही वेळ आली. वृध्दाश्रमात जेवण व राहण्याची सोय झाल्यामुळे त्यांच्या जीवनाचा प्रवास पुन्हा सुरक्षित झाला. मात्र, रविवारी सकाळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी वृध्दाश्रमातील कर्मचाऱ्यांकडे मदतीची मागणी केली. मात्र, एकट्याला अमरावतीला उपचारासाठी नेणार कोण, असा प्रश्न वृध्दाश्रमातील कर्मचाऱ्यांना पडला. मात्र, प्रकृती खालावत असल्याचे पाहून भगवंत हे स्वत:च औषधोपचारासाठी इर्विन रुग्णालयात आले. आॅटोेरिक्षा थांबताच भगवंत कसेबसे खाली उतरले. मात्र, रुग्णालयाच्या दोन पायऱ्या चढण्याची शक्ती त्यांच्यामध्ये नव्हती. त्यांची प्रकृती अत्यवस्थ होत होती. त्यांना नैसर्गिक विधीचे भानही उरले नव्हते. मदतीच्या अपेक्षेने ते इर्विनमध्ये ये-जा करण्याऱ्या नागरिकांकडे बघत होते. मात्र, खाली पडलेल्या वृध्दाला कोणीही उपचाराकरिता आत नेण्याची तसदी घेतली नाही. अखेर ‘लोकमत’ प्रतिनिधीने ही स्थिती बघून रूग्णालयातील डॉक्टर, परिचारीकांशी संपर्क साधला. त्यावेळी स्ट्रेचरही उपलब्ध नव्हता. परिचारिकेने वॉर्डबॉयला बोलावून त्यांना दाखल करून घेतले. या वृध्दांचा वाली कोण? अमरावती आता स्मार्ट सिटी होणार आहे. मात्र, शहरातील अनेक निराधार वृध्दांची अशी फरफट होतेय. कुटुंब, मुले-बाळ असूनही त्यांचे हाल होताहेत. वृध्दाश्रमातही त्यांचे जीणे सोयीचे नाही. तेथेही हालअपेष्टाच वाट्याला येतात. भगवंत नामक या वृध्दाप्रमाणेच अनेक ज्येष्ठ नागरिक या परिस्थितीतून जाताहेत. त्यांचे पुनर्वसन करून म्हातारपणी वाट्याला येणाऱ्या हालअपेष्टा थांबविता येणे त्यासाठीच गरजेचे आहे.
मुलांनी झिडकारले, वृद्धाश्रमातही होतेय फरफट
By admin | Updated: September 28, 2015 00:15 IST