नरेंद्र जावरे
२४ हजार मजुरांच्या हाताला काम : स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न
चिखलदरा (अमरावती) : चिखलदरा म्हटले की, स्थलांतर हा शिरस्ताच झाला आहे. दरवर्षी चिखलदरा तालुक्यातून हजारो मजूर पोटासाठी स्थलांतर करतात. रोजगाराच्या कमी संधी असल्याने तसेच व्याघ्र प्रकल्पाचा भाग असल्याने उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे येथील आदिवासींना रोहयोच्या कामावर अवलंबून राहावे लागते. रोहयोचे काम मिळाले नाही, तर त्यांचे स्थलांतर अटळ असते. नेहमीचा हा अनुभव लक्षात घेऊन प्रशासनाने सुरुवातीपासूनच नियोजन केले. ते नियोजन राज्यात अव्वल ठरले. चिखलदरा तालुका रोहयो मजुरांच्या उपस्थितीत अव्वल ठरला आहे.
पंचायत समिती, तहसील स्तरावर नवीन कामांचे अंदाजपत्रक बनवून प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या. कामे हवीत, असे मागणीपत्र असलेल्या नमुना ४ च्या दहा हजार प्रती ग्रामपंचायतला वितरित केल्या गेल्या. तांत्रिक अधिकारी, ग्रामसेवक आणि ग्रामरोजगार सेवकांच्या बैठका घेऊन नियोजन करण्यात आले. या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. चे सीईओ अमोल येडगे, धारणीच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, तहसीलदार माया माने, बीडीओ प्रकाश पोळ यांनी योग्य नियोजन आखले.
बॉक्स
स्थलांतर रोखण्यात यश
१५ दिवसांपूर्वी दोन हजार मजूर उपस्थितीवरून २ डिसेंबर रोजी चिखलदरा तालुक्याने २४ हजार मजुरांपर्यंत मजल मारली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात १ लाख ७३ मजूर रोहयोच्या विविध कामांवर हजर आहेत. यातील ५० हजार ३५७ एकट्या अमरावती जिल्ह्यात आहेत. पैकी २४ हजार १४० मजूर चिखलदरा तालुक्यातील विविध कामांवर उपस्थित आहेत. मजुरांना मोठ्या प्रमाणात हाताला काम मिळाले आहे. वर्षभर अशीच कामे सुरू राहण्याची अपेक्षा मजुरांनी व्यक्त केली असून, स्थलांतर रोखण्यात प्रशासनाला बऱ्याच प्रमाणात यश आले असल्याचे बीडीओ प्रकाश पोळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोट
यावर्षी कमीत कमी स्थलांतर होईल, यासाठी पूर्ण नियोजन केले आहे. चिखलदरा आणि धारणी मिळून ३५ हजार मजुरांच्या हाताला काम दिले आहे.
मिताली सेठी, प्रकल्प अधिकारी
कोट
दरवर्षीप्रमाणे यावर्षी स्थलांतर होऊ नये म्हणून मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार व्यवस्थित काम चालू आहे.
अमोल येडगे, सीईओ, जिल्हा परिषद, अमरावती
कोट
चिखलदरा मजूर उपस्थितीमध्ये महाराष्ट्रात अव्वल ठरला. धारणीमध्येही चांगली उपस्थिती आहे. मेळघाटातील आदिवासींचे रोहयोच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्याचा मानस आहे.
शैलेश नवाल, जिल्हाधिकारी
-------------------------------------