मेळघाटातील आदिवासी वाऱ्यावर : तर परतवाडा डेपो बंद करूपरतवाडा : मेळघाटातील आदिवासींना वाऱ्यावर सोडून बसफेऱ्या रद्द करण्यासह चिखलदरा बसफेरी कागदावर दाखविण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात त्या बसेस अमरावतीमार्गे चालविण्याचा अजब प्रकार उघडकीस आणून आपल्या तक्रारतील विविध समस्यांची दखल वेळीच न घेतल्यास कोणत्याही क्षणी आदिवासी बांधवाना सोबत घेऊन परतवाडा बस डेपो बंद करण्यात येईल, असा इशारा मेळघाटचे माजी आ.राजकुमार पटेल यांनी गुरुवारी विभागीय नियंत्रकांना दिला. परिवहन विभागात एकच खळबळ उडाली आहे. परिवहन महामंडळाला वारंवार पत्र देऊनसुद्धा कुठलीच कारवाई वजा सुधारणा न करता आपल्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आल्याचा आरोप राजकुमार पटेल यांनी केला आहे. आता थेट बस डेपोच बंद करण्याचा इशारा त्यांनी दिल्यामुळे परिवहन महामंडळाला हा मोठा धक्का मानला जात आहे. परतवाडा ते चुरणी ही बससेवा सेमाडोहमार्गे सुरू करण्यात यावी, धारणी ते बैरागड, रत्नापूर मार्गे स्कूल बस सुरू करावी, बाजार गाड्या पुन्हा सुरू करण्यात याव्या, चिखलदरा येथे जाणाऱ्या चार बसफेऱ्या बंद करण्यात आल्या त्या पूर्ववत सुरू करण्यात याव्या आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. याची वेळीच दखल शासन घेते काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)चिखलदरा बसफेरी अमरावती मार्गावरपरिवहन विभागाचा भोंगळ कारभार पाहता विदर्भाचे पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदरा येथील बसफेऱ्या बंद करण्यात आल्या, दुसरीकडे शेड्यूल क्रमांक ७१ बस फेरी कागदोपत्री चिखलदऱ्यात जात असल्याचे दाखवून परतवाडा, अमरावती मार्गावर धावत असल्याचे राजकुमार पटेल यांनी तक्रारीत नमूद केले आहे. हा आदिवासी, विद्यार्थी, शेतकरी, शासकीय कर्मचारी व पर्यटकांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार असून मागण्या मान्य न झाल्यास बस डेपो बंद करण्याचा इशारा त्यांनी पत्रातून संबंधितांना दिला आहे.
चिखलदरा बस धावते फक्त कागदावर !
By admin | Updated: June 25, 2016 00:03 IST