कार्यालयात फायलींचा खच, मुख्य लेखाधिकारी गायब; महापालिका आयुक्त हैराण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 01:27 PM2021-10-31T13:27:47+5:302021-10-31T13:39:08+5:30

दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, लेखा विभागात आयुक्त, उपायुक्त व अन्य अधिकाऱ्यांकडून देयके मंजूर होऊन आले असताना त्यावर स्वाक्षरीसाठी मुख्य लेखाधिकारी मिळत नसल्याची ओरड आहे.

Chief Accounts Officers unprofessional behavior at amravati Municipal Crporation | कार्यालयात फायलींचा खच, मुख्य लेखाधिकारी गायब; महापालिका आयुक्त हैराण?

कार्यालयात फायलींचा खच, मुख्य लेखाधिकारी गायब; महापालिका आयुक्त हैराण?

googlenewsNext
ठळक मुद्देदिवाळीपूर्वीची देयके तयार, स्वाक्षरीअभावी धनादेश थांबले

अमरावती : महापालिकेचा कारभार ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असा सुरू असताना गत आठवड्यात दोन दिवस अचानक मुख्य लेखाधिकारी गायब होते. ते नेमके गेले कुठे, याचा शोध कर्मचारी, कंत्राटदारांनी घेतला. मात्र, काहीच थांगपत्ता लागला नाही. मुख्य लेखाधिकाऱ्यांच्या ‘मदहोश’ कारभाराने आयुक्तसुद्धा हैराण झाले आहेत.

महापालिका तिजोरीत ठणठणाट आहे. बांधकाम, प्रकाश विभाग, आरोग्य विभागाच्या कंत्राटदार थकीत देयके मिळावी, यासाठी लेखा विभागाच्या पायऱ्या झिजवून थकले आहेत. दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, लेखा विभागात आयुक्त, उपायुक्त व अन्य अधिकाऱ्यांकडून देयके मंजूर होऊन आले असताना त्यावर स्वाक्षरीसाठी मुख्य लेखाधिकारी मिळत नसल्याची ओरड आहे.

लेखा विभागात फायलींचा खच वाढला आहे. दुसरीकडे देयके मिळविण्याकरिता पुरवठादार, कंत्राटदारांचे ‘प्रेशर’ वाढत आहे. कार्यालयीन वेळेत मुख्य लेखाधिकारी हेमंत ठाकरे नेमके जातात कुठे? हा संशोधनाचा विषय आहे. गत आठवड्यात गुरुवार, शुक्रवार असे दोन दिवस कंत्राटदार देयकांच्या फायलींवर स्वाक्षरी घेण्यासाठी मुख्य लेखाधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत होते. मात्र, ते कार्यालयात आलेच नाही, अशी माहिती आहे. ठाकरे यांच्या अफलातून कारभाराबाबत आयुक्तही हैराण झाले आहेत. ना सुटी, ना अर्ज तरीही मुख्य लेखाधिकारी कार्यालयात नाही, असा सैराट कारभार आयुक्त प्रशांत रोडे यांच्या नेतृत्वात सुरू आहे.

मुख्य लेखाधिकाऱ्यांच्या दालनात वेगळाच ‘सुगंध’

महापालिकेत अतिशय महत्वाचा विभाग असलेल्या लेखा विभागाचे मुख्य लेखाधिकारी यांच्या दालनात वेगळाच सुगंध’ दरवळत असल्याचे लक्षात येते. एकदवेळी असा ‘सुगंध’ आल्यास कुणी समजू शकते. परंतु, मुख्य लेखाधिकाऱ्यांच्या दालनात कार्यालयीन वेळेत हा वेगळाच ‘सुगंध’ अनुभवता येतो. त्यामुळे हा ‘सुगंध’ आहे तरी कशाचा? याचा शोध आयुक्त प्रशांत रोडे यांनी घेतल्यास वास्तव समोर येईल, अशी चर्चा महापालिकेत रंगू लागली आहे.

Web Title: Chief Accounts Officers unprofessional behavior at amravati Municipal Crporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार