पोलिसांचे दुर्लक्ष : वाहतूक व्यवस्था कोलमडली, हात ओले करण्याची धडपडअचलपूर : शासनाने गोवंशहत्या प्रतिबंधक कायदा लागू केला असला तरी जनावरांना अमानुषपणे वाहनांमध्ये कोंबून अवैधरीत्या जनावरांची वाहतूक सुरू असतानाही वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अचलपूर-परतवाड्याचा विस्तार लक्षात घेता पाच वर्षांपूर्वी येथे वाहतूक पोलिसांची वेगळी शाखा देण्यात आलीे. शहरातील अस्ताव्यस्त वाहतूक व वाहनांची कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. जनावरे नेणारे किंवा बाहेर गावाहून आणणारे वाहन बरोबर हेरून वाहनधारकाकडून टोल वसूल करीत असल्याचे दृष्टीस पडते. जुळे शहर मध्यप्रदेशच्या सिमेपासून थोड्या अंतरावर आहे. तसेच अचलपूर तालुका व मेळघाटची बाजारपेठ देखील आहे. अचलपूर-परतवाड्याचा भौगोलिक विस्तार झपाट्याने होत आहे. लोकसंख्याही वाढत आहे. सोबतच वाहनांची संख्याही वाढतेच आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत व्हावी, येथे चालणारी गोवंशाची चोरटी वाहतूक थांबावी यासाठी शासनाने येथे वाहतूक पोलिसांची स्वतंत्र शाखा दिली होती. गेल्या एक ते दीड वर्षापासून या वाहतूक शाखेचे प्रभारी निरीक्षक सतीश चवरे आहेत. सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ४ ते ९ या वेळेत जुळ्या शहरात वाहतुकीची कोंडी होते. व्यावसायिक रस्त्याच्या कडेला वाहने कुठेही उभी करतात. याकडे दुर्लक्ष करून वाहतूक पोलीस रस्त्यावरून जनावरे वाहून नेणारी वाहने शोधत असतात. वाहतूक पोलिसांना शहरात एखादे जनावरे वाहून नेणारे वाहन हेरले तरी त्याला तेथे न थांबवता शहराबाहेर अडवताना दिसत आहेत. वाहतुकीच्या इतर समस्या यामुळे दुर्लक्षित राहात असल्याच्या तक्रारी आहेत.
जनावरांची ट्रकमध्ये कोंबून वाहतूक
By admin | Updated: July 9, 2015 00:16 IST