अमरावती : अनधिकृतपणे बांधकाम पाडल्याप्रकरणी अखेर चेतनदास बालाजी मंदिर संस्थानच्या सहा विश्वस्तांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने खोलापुरी गेट पोलिसांना शनिवारी दिलेत. हे बांधकाम पाडताना तक्रारकर्ते सत्यनारायण गणपत शर्मा (५५, रा.रामप्यारी गल्ली) यांचे वडिल जखमी झाले होते. गुन्हे दाखल करण्यात आलेल्या विश्वस्तांमध्ये बैजनाथ केशरवाणी, विजय मंगरोरिया, सतीश शर्मा, शाम गुप्ता, अमित केशरवाणी आणि आशुतोष शर्मा यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुध्द भादंविचे कलम ३३६, ३३७, २८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामप्यारी गल्लीत सत्यनारायण शर्मा याच मंदिराच्या पहिल्या माळ्यावर कुटुंबीयांसमवेत राहात होते. या मंदिराचा काही भाग शिकस्त झाला होता. ३० जुलै २०१२ रोजी चेतनदास बालाजी मंदिराच्या विश्वस्तांनी मंदिरासमोरील प्रवेशद्वाराचा काही भाग पाडला. त्यावेळी रामप्यारी मंदिराच्या पहिल्या माळ्यावरील खांबाला धक्का पोहोचला आणि घर कोसळले. यात गणपतलाल शर्मा मलब्याखाली दबल्याने गंभीर जखमी झाले होते. मंदिराचा भाग पाडण्यापूर्वी विश्वस्तांनी शर्मा यांना घर रिकामे करण्यासंदर्भात नोटीस दिली नाही. ३० जुलै २०१२ रोजी सत्यनारायण शर्मा यांनी याबाबत खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी त्या तक्रारीची फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे सत्यनारायण शर्मा यांनी संबंधित विश्वस्तांवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची याचिका स्थानिक न्यायालयात सादर केली. त्यावर २१ मार्च २०१३ आणि १८ फेब्रुवारी २०१६ रोजी कलम १५६ (३) सीआरपीसी प्रमाणे दखलपात्र गुन्हा नोंदवून तपास करण्याचे लेखी आदेश पोलिसांना न्यायालयाने दिले. त्यानंतर खोलापुरी गेट पोलिसांनी ३० जुलै २०१२ रोजीची सत्यनारायण शर्मा यांची तक्रार ग्राह्य धरून बैजनाथ केशरवाणीसह सहा विश्वस्तांविरुध्द गुन्हे नोंदविले आहेत.
चेतनदास बालाजी मंदिर संस्थानच्या विश्वस्तांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: April 4, 2016 00:45 IST