वनविभाग प्रयत्नरत : निसर्ग संवर्धन, वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा उद्देश वैभव बाबरेकर अमरावती निसर्ग संवर्धन व वन्यप्राण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वडाळी वनपरिक्षेत्रातील वाहतूक मार्गावर चेकपोस्ट लावण्याची तयारी आता वनविभागाने सुरू केली आहे. त्यासाठी वनविभागाने प्रयत्न सुरू केले असून शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. अमरावती शहरालगत असणारे समृद्ध जंगल हे विविध जैवविविधतेने संपन्न आहे. वडाळी वनपरिक्षेत्रातील या संरक्षीत जंगलात वाघ, बिबट, तडस, हरिण निलगाय अशा आदी वन्यप्राण्यांसह ३५० हून अधिक पक्षी प्रजाती वास्तव्यास आहेत. या जंगलातूनच अमरावती-चांदूररेल्वेकडे जाणारा मार्ग आहे. या जंगलात लहानसहान गावखेडे असून दररोज जंगलातील मार्गावरून सततची वाहतूक सुरू असते. दिवस-रात्र या मार्गावर वाहनांची वर्दळ राहत आहे. या जंगलात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे आता वन्यप्राण्यांच्या अधिवासाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. जंगलशेजारी मानवी हस्तक्षेपामुळे वाढते प्रदूषण हे वन्यप्राण्यांच्या दिनचर्येत अडथळा निर्माण करणारे ठरत आहे. वाढत्या वाहनामुळे होणारे ध्वनी प्रदूषण हे वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण करीत आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे जलप्रदूषणाला धोका अमरावती : जगंलात मटन व दारूच्या पार्ट्या रंगविणे, प्लॅस्टिकचा कचरा फेकणे, ध्वनी प्रदुषण करणे, जगंलात फिरणे असे आदी प्रकार वाढल्यामुळे वन्यप्राण्यांचे अस्तित्वच धोक्यात आलेले आहे. त्यातच वन्यप्राण्यांसाठी महत्वाचे असणारे पाणी हे मानवी हस्तक्षेपामुळे जलप्रदुषणाच्या विळख्यात सापडले आहे. दिवसेदिवस असे प्रकार वाढत असल्यामुळे वन्यप्राण्यासह पक्षी प्रजातीचा अधिवास धोक्यात आला आहे. या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी वनविभागाने आता पाऊल उचलले असून जंगलातून जाणाऱ्या मार्गावर वनविभागाकडून चेकपोस्ट लावले जाणार आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनांवर व नागरिकांवर वनविभाग लक्ष केंद्रीत करणार आहे. चेकपोस्ट लागल्यानंतर जंगलात फिरणाऱ्यांचे प्रमाण कमी होऊन वन्यप्राण्यांचा अधिवास सुकर होऊ शकतो.
जंगल मार्गावर आता 'चेकपोस्ट'
By admin | Updated: January 2, 2017 01:00 IST