२८ सभासदांची तक्रार : भूखंडाचे वाटप मात्र हस्तांतरण नाही वरुड : स्थानिक शिवाजी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाने संस्थेच्या अधिकारात गृहनिर्माणासाठी घेतलेल्या भूखंडाचे सभासदांना वाटप केले. मात्र, हे भूखंड हस्तांतरित केले नसल्याने फसवणूक झालेल्या संस्थेच्या २८ सभासदांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यावरून वरुड पोलिसांनी शिवाजी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष युवराज कराळेविरुध्द मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. शिवाजी गृहनिर्माण संस्थेची स्थापना सन १९८० मध्ये झाली होती. संंस्थेतर्फे सभासदांना भूखंड देऊन हक्काची घरे देण्याची योजना होती. या संस्थेमध्ये जि.प. कर्मचारी, शिक्षक, शहरातील नागरिकांनी सभासदत्व घेतले होते. कालांतराने या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा युवराज कराळे यांनी सांभाळली. यातील काही सदस्य मृतक आहेत. संस्थेने गृहनिर्माणाकरिता तिवसाघाट रस्त्यावर नागसेन बुध्दविहार असलेले शेत विकत घेतले होते. हे ठिकाण शहरापासून लांब असल्याने ते विकण्यात आले. यानंतर पावडे महिला महाविद्यालय असलेले शेत खरेदी करण्यात आले. परंतु सन १९९१ मध्ये या शेतातून पुराचे पाणी गेल्याने हे शेत सुध्दा विकण्यात आले. पश्चात अमरावती मार्गावर शेत सर्व्हेनं.४३३/ १,४३३/१ (अ), व ४३४/२ अशी मालमत्ता संस्थेने विकत घेतली. शेत सर्व्हे नं ४३३/१ हे शेत सन २०१० साली विकण्यात आले. यावेळी संस्थेच्या सभासदांना विश्वासात न घेता परस्पर शेत विकण्यात आले. यामुळे सभासदांची फसवणूक झाली. या शेतात सभासदांचे भूखंड असल्याने सन २०१२ मध्ये काही सभासदांनी ओरड केली होती. आणि सहनिबंधक कार्यालयासह पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. मात्र, त्यावेळी काहीही कारवाई झाली नव्हती. अखेर संस्था निबंधकाकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर १८ जानेवारी २०१६ ला ४३३/१(अ) मधील तीन एकर ६ आर. जमीन विकण्यात आली. यामुळे अन्यायग्रस्त सभासदांनी पोलीसाकडे धाव घेतली. संस्थेच्या अध्यक्षांनी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लेखी स्वरूपात प्लॉट देण्याचे तसेच जमीन अकृषक करण्याचे लिहून दिले आहे. तसेच सर्व्हे नं ४३३/१ मध्ये प्लॉट असल्याचे दाखले देवूनसुध्दा ते प्लॉट विकण्यात आले होते. यामुळे सभासदांची फसवणूक झाल्याची बाब उघड झाली. सर्व्हे नं ४३३/१अ मध्ये सभासदांचे प्लॉट असून सुध्दा ते शेत विकण्याचा सौदा केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारकर्त्यांमध्ये फिर्यादी राजेंद्र बाबाराव पाटील (५९, रा. वरुड) यांच्यासह २८ सभासदांचा समावेश आहे. पुढील तपास ठाणेदार अर्जुन ठोसरे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
शिवाजी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा
By admin | Updated: February 10, 2016 00:19 IST