अमरावती : पंतप्रधान पीक विमा योजनेतील निकषातील त्रुटींमुळे शेतकरी बांधवांना वेळेवर योग्य भरपाई मिळत नाही. त्यामुळे आवश्यक बदल व सुधारणा व्हावी. जेणेकरून दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी बांधवांना विम्याचा लाभ मिळेल, अशी मागणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
केंद्र शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली. या योजनेत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकांना विम्याचे संरक्षण मिळावे व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे, हा या योजनेचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान पीक विमा योजनेत केवळ विमा कंपन्यांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांना होत नाही. पीक विमा योजनेंतर्गत परतावा शेतकऱ्यांना वेळेत मिळत नाही. मिळालाच तर खूप उशिरा व अल्प प्रमाणात मिळतो. याबाबत केंद्र शासनाकडून तालुका व जिल्हा स्तरावर तक्रारी निवारणासाठी कोणतीही यंत्रणा नाही. पीक विम्याचा परतावा देण्यास कंपनी विलंब करत असेल तर कंपनीला दंड ठोठावण्याची तरतूद केलेली नाही, असे पालकमंत्र्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
बॉक्स
उत्पन्न निश्चत करण्याची पद्धत सदोष
पंतप्रधान पीक विमा योजनेत अनेक त्रुटी आहेत. या योजनेत शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चित करण्याची पद्धत योग्य नाही. दुष्काळ किंवा अतिवृष्टीत शेतकऱ्यांना मदतीचा उद्देश सफल होताना दिसत नाही. योजनेतील दुष्काळाचे निकष व कंपन्यांच्या पीक विम्याच्या पात्रतेचे निकष यात ताळमेळ बसत नाही. त्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विम्याचा लाभ मिळत नसल्याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.