देशमुख गटाचे वर्चस्व : उपाध्यक्षपदी श्रीपाद आसरकर चांदूरबाजार : स्थानिक खरेदी-विक्री संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी अविरोध पार पडली. या निवडणुकीत सहकार नेते बबलू देशमुख गटाचे शिवाजी बंड अध्यक्षपदी, तर श्रीपाद आसरकर हे उपाध्यक्षपदी अविरोध निवडून आले.निवडणुकीचे प्राधिकृत अधिकारी किशोर बलिंगे यांनी दुपारी एक वाजता या प्रक्रियेला सुरुवात केली. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी फक्त एक अर्ज आल्यामुळे प्राधिकृत अधिकाऱ्यांना पुढील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे ही निवड प्रक्रिया सन २०१४ च्या नियम ७७ व संस्थेच्या उपविधीमधील तरतुदीनुसार संस्थेच्या प्रोसिडिंगमध्ये ठराव लिहून पार पाडण्यात आली. त्यानंतर दुपारी २ वाजता रीतसर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची अविरोध निवड झाल्याचे घोषित केले. याप्रसंगी सहायक प्राधिकृत अधिकारी म्हणून योगेश जयस्वाल तर मदतनिस म्हणून संस्थेचे व्यवस्थापक अशोक नवलकर यांनी काम पाहिले. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या अविरोध निवडीची घोषणा होताच संस्थेच्या पटांगणात बबलू देशमुखांच्या समर्थकांनी जल्लोष केला. खरेदी-विक्री संस्थेच्या आवारात आतषबाजी करण्यात आली. यावेळी बबलू देशमुख स्वत: उपस्थित होते. निवडणुकीदरम्यान अध्यक्षपदाच्या उमेदवारास सूचक म्हणून मिलिंद कांडलकर, अनुमोदक म्हणून मुकुंद मोहोड यांनी तर उपाध्यक्षपदाच्या उमेदवारास सूचक म्हणून प्रताप किटुकले व अनुमोदक म्हणून श्रीकृष्ण वानखडे भूमिका पार पाडली. निवडणूक प्रक्रियेत संजय गुर्जर, शिवाजी काळे, उमेश बगने, साहेबराव पोहोकार, रमेश घुलक्षे, नामदेव शेकार, नीता मडघे, नीलिमा लंगोटे व नंदकिशोर विधळे इत्यादी संचालक सहभागी झाले होते.तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती प्रहारकडून हिरावून घेतल्यानंतर तालुका खरेदी-विक्री संस्थेवरही एकहाती सत्ता संपादन केल्यानंतर तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. तालुक्याचे दमदार नेतृत्व म्हणून बबलू देशमुख यांच्याकडे बघितले जात आहे. या यशाबद्दल बबलू देशमुख यांच्यासह नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी बंड व उपाध्यक्ष श्रीपाद आसरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
चांदूर खविसंच्या अध्यक्षपदी बंड
By admin | Updated: December 15, 2015 00:11 IST