फोटो पी ०९ चिखलदरा देवी
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावरील प्रसिद्ध देवी पॉईंट येथे विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व आदिवासींच्या आराध्यदैवत असलेल्या मंदिरात दरवर्षी भरणारी चैत्र यात्रा रद्द करण्यात आली आहे.
कोरोना या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या आदेशाला अनुसरून तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी अमरावती स्थित अंबादेवी संस्थानद्वारे संचालित चिखलदरा येथील श्री देवी मंदिर देवी पॉईंट येथील चैत्र शुद्ध प्रतिपदा १३ ते २१ एप्रिलपर्यंत होणारा चैत्र नवरात्रोत्सव व यात्रा रद्द करण्याचा निर्णय श्री अंबादेवी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे. ही देवी चिखलदरा, मेळघाटसह विदर्भ व मध्य प्रदेशातील हजारो आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत आहे.
बॉक्स
प्रसिद्ध नवसाची यात्रा
आदिवासींचे आराध्यदैवत असल्याने चैत्र महिन्यात भरणाऱ्या यात्रेत हजारो बोकडांचा बळी दिला जातो. त्यानंतर गावकरी व कुटुंबातील सहकारी येथे भोजन पंगती करतात. आदिवासींमध्ये नवस फेडण्याची पारंपरिक प्रथा आहे. राज्य शासनाने त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत बंदी आणली असली तरी आजही आदिवासी पूजापाठ करून काही गावांमध्ये, तर काही येथेच तो नवस फेडतात. मात्र, यंदा यात्रा रद्द झाल्याने कबूल केलेला नवस यंदा त्यांना फेडता येणार नाही.
कोट
चिखलदरा येथील चैत्र महिन्यात भरणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला माहिती दिली आहे. नागरिकांनी कोरोना संसर्गाचा प्रसार व गैरसोय टाळण्यासाठी न येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
- माया माने, तहसीलदार, चिखलदरा