लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाठविलेला मेल कंपनीच्या सीईओंचा असल्याचे भासवून त्या कंपनीत काम करणाऱ्या अभियंता तरुणाला ७६ हजार २०० रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. १८ ऑगस्ट रोजी रात्री ७.३८ ते ९ या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी ओमप्रकाश रामदास ठाकरे (२५, रा. जवळापूर, ता. अचलपूर) यांच्या तक्रारीवरून पथ्रोट पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.ओमप्रकाश ठाकरे हा तरुण हैद्राबाद येथील कंपनीत कार्यरत आहे. मात्र, एक वर्षापासून त्याचे ‘वर्क फ्राॅम होम’ सुरू आहे. १८ ऑगस्ट रोजी ओमप्रकाशला कंपनीचे सीईओ वासू सत्यपल्ली यांच्या नावाने त्यांच्याच ई-मेलवरून एक ईमेल आला. ७६ हजार २०० रुपये कंपनीच्या व्हेंडरला भरायची आहे, असे त्यात नमूद होते. तो ईमेल कंपनीच्या सीईओंचा असल्याचे समजून ओमप्रकाशने फोन-पेवरून ३१ हजार १०० व ४५ हजार १०० रुपये हुबळी (कर्नाटक) येथील खात्यावर पाठविले. रक्कम पाठविल्याची माहिती त्याने सीईओंसह व्हॉटस्ॲप ग्रुपवर शेअर केली. त्यावेळी कंपनीच्या सीईओंकडून असा कुठलाही इमेल पाठविण्यात आला नाही, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ग्रुपवर खातरजमा केल्यानंतर ही फसवणूक उघड झाल्याची माहिती पथ्रोटचे ठाणेदार सचिन जाधव यांनी ‘लोकमत’ला दिली.
केवायसी अपडेशन, क्यूआर कोड स्कॅन करायला लावून ऑनलाईन गंडा घातल्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. मोबाईलधारकाने एनी डेस्क, टीम व्यूव्हर हे अप्लिकेशन डाऊनलोड करू नये. ओटीपी, एटीएम कार्डचा क्रमांक, पिन कुणाशीही शेअर करू नका.- सीमा दाताळकरपोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे
केवायसीच्या नावावर १.३९ लाखांचा गंडा वलगाव रोडवरील पॅराडाईज काॅलनीत राहणाऱ्या वहीद खुशमुद अली यांना सिमकार्ड केवायसी व्हेरिफिकेशन पेंडिंग असल्याची बतावणी करण्यात आली. मॅसेज पाठवून टीम व्यूव्हर हा ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यामाध्यमातून त्यांच्या खात्याची सर्व माहिती मिळवून खात्यातून चक्क १ लाख ३९ हजार १० रुपये परस्पर विड्रॉल करण्यात आले. २१ ऑगस्ट रोजी दुपारी ३.११ ते ४.२० या एक तासाच्या कालावधीत ही फसवणूक झाली. सायबर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.