केंद्रीय पथक घेणार जलजीवन कामांची ‘ऑन द स्पॉट’ झाडाझडती

By जितेंद्र दखने | Published: March 8, 2024 10:29 PM2024-03-08T22:29:16+5:302024-03-08T22:29:54+5:30

रविवारपासून पाच दिवस दौरा : अमरावती, अचलपूर तालुक्यात तपासणी

central team will undertake 'on the spot' jal jeevan works | केंद्रीय पथक घेणार जलजीवन कामांची ‘ऑन द स्पॉट’ झाडाझडती

केंद्रीय पथक घेणार जलजीवन कामांची ‘ऑन द स्पॉट’ झाडाझडती

अमरावती: केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांची ९ ते १४ मार्चदरम्यान केंद्राच्या पथकाकडून सलग पाच दिवस विविध गावांना भेटी देऊन ‘ऑन द स्पॉट’ झाडाझडती घेतली जाणार आहे. या तपासणीकरिता केंद्राचे पथक येत असल्याने प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जलजीवन मिशनच्या कामांच्या तपासणीसाठी ए. के. सक्सेना यांच्या नेतृत्वातील सात सदस्यीय पथक अमरावती आणि अचलपूर तालुक्यातील जवळपास १५ गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन वैयक्तिक शाैचालय, सार्वजनिक स्वच्छतागृह, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व जलजीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक कुटुंबाकडील नळजोडणी तसेच पाणी गुणवत्ताविषयक बाबींची तपासणी केंद्रीय पथकाकडून केली जाणार आहे.

यासोबतच गावातील वैयक्तिक शाैचालय कुटुंबाची ऑनलाइन यादी, सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेची पाहणी, ग्रामीण आरोग्य पोषण आहार, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या बैठकीचे कार्यवृत्त दस्तऐवज तपासणी, पाणी गुणवत्ताविषयक तपासणीकरिता निवड केलेल्या पाच महिलांकडून तपासणी केलेल्या कामाची माहिती आदींचा लेखाजोखा केंद्रीय चमूकडून तपासला जाणार आहे. पाच दिवसांमध्ये केंद्र शासनाची ही चमू १५ गावांतील कामांची तपासणी करणार असल्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

...या गावात देणार भेटी
जिल्हा मुख्यालयात १० मार्च रोजी सकाळी आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर दुपारी २:०० ते ४:०० या वेळेत अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी, अंबाडा कंडारी, ११ मार्चला बोर्डी, असदपूर, बळेगाव, भिलोना, अमरावती तालुक्यातील लोणटेक, मलकापूर, वडगाव माहोरे, १३ मार्च रोजी अंजनगाव बारी, कुंड सर्जापूर, कठोरा बु., नांदुरा पिंगळाई, आणि १४ मार्च रोजी अचलपूरमधील बेलखेडा, भुगाव आदी गावांत ‘ऑन द स्पॉट’ कामांची तपासणी केली जाणार आहे.

Web Title: central team will undertake 'on the spot' jal jeevan works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.