अमरावती : राज्यात ई-गव्हर्नन्सच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अमरावतीसह राज्यात जिल्हा परिषद स्तरावर मध्यवर्ती माहिती व तंत्रज्ञान कक्ष (आयटी सेल) स्थापन करण्यात येणार आहे. आयटी सेलच्या कामकाजाचा आढावा प्रत्येक महिन्याला किंवा गरजेनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती घेईल. राज्यातील विविध प्रशासकीय विभागाच्या अधिपत्याखालील कल्याणकारी विकास योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येतात. या योजनांची अंमलबजावणी व देखरेख जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर होते. योजनांसाठी प्राप्त निधी, भौतिक व आर्थिक प्रगती अहवाल संंबंधित योजनांशी निगडित आज्ञावलीत भरण्यात येते. या योजनांसाठी प्रशासकीय खर्चातून तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यात येते. याशिवाय ग्रामविकास विभागामार्फत ई-पंचायत, संग्राम प्रकलपांतर्गतही संबंधीत पंचायती राज संस्थांना महाआॅनलाईन या अंमलबजावणी यंत्रणेमार्फत कंत्राटी तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. आता माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन जलद गतीने माहिती उपलब्ध करुन देणे, उपलब्ध माहितीच्या आधारे विकासकामांचे नियोजन व परिणामकारक अंमलबजावणी देखरेख, माहितीचे विविध प्रशासकीय विभागांमध्ये आदान-प्रदान व विविध प्रणालीचा परिणामकारक वापर करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर मध्यवर्ती व माहिती व तंत्रज्ञान कक्ष काम करणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद स्तरावर स्थापणार मध्यवर्ती आयटी सेल
By admin | Updated: August 27, 2014 23:12 IST