उपेक्षित समाज महासंघ : उलगडतील अनेक पदर !अमरावती : महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा अधिनियमानुसार ‘नरबळी आणि इतर अमानुष आणि अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा’ कृती ही स्वत: करणे किंवा कोणाकडून करवून घेणे, हा गुन्हा ठरतो. त्या अनुषंगाने पिंपळखुटा येथील संत शंकर महाराज आश्रमात घडलेला प्रकार हा अघोरी आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी उपेक्षित समाज महासंघाने केली आहे. याप्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असलेले संत शंकर महाराजांना तातडीने अटक करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. प्रथमेश सगणे या चिमुरड्याचा गळा नरबळी देण्याच्या उद्देशाने चिरण्यात आला. त्यातून तो सुदैवाने बचावला. परंतु याप्रकरणातील अनेक कांगोरे उलगडण्यासाठी त्याची सीबीआय चौकशी करणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांना सुपूर्द करण्यात आले. निवेदन देताना श्रीकृष्ण बनसोड, कामगार नेता श्रीकृष्णदास माहोरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे भाऊसाहेब कोहळे, भास्कर बसवनाथे, बी.जी.खोब्रागेड, दे.सू.बसवंत, उत्तम भैसने, राजेश तायडे, शिवमंगल चव्हाण उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नरबळी प्रकरणाची सीबीआय चौकशी करा
By admin | Updated: August 26, 2016 00:22 IST