अमरावती : विना परवाना, विना बिल विक्री होत असलेल्या कामोत्तेजक औषधांचा साठा धारणी शहरात पकडण्यात आला. ही कारवाई गुरुवारी अमरावती औषधी प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली. या कारवाईमुळे धारणीत खळबळ उडाली असून हा साठा आठ हजारांचा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
धारणी शहरातील शांती मेडिकलचे संचालक सूरजकुमार मालवीय यांच्या घरात हा साठा सापडला. औषधी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त उमेश घराटे व औषधी निरीक्षक मनीष गोतमारे यांनी शांती मेडिकलवर धाड टाकली. तेव्हा मेडिकलचे परवान्याचे अधिकृत फलक लावण्यात आले नव्हते. त्यांनी घराची झडती घेतली असता घरात सात ते आठ हजाराचा कामोत्तेजक औषधीसाठा आढळून आला. या औषधसाठ्याचे अधिकृत बिलसुद्धा मेडिकलच्या संचालकाकडे नव्हते. त्यामुळे घरात साठवून ठेवलेला साठा जप्त करण्यात आला. त्याचे नमुनेसुद्धा जप्त केले असून ते तपासणीकरिता पाठविण्यात येणार असल्याचे औषधी निरीक्षक मनीष गोतमारे यांनी सांगितले. सदर मेडिकलच्या संचालकावर १८ सी, १८ ए नुसार कारवाई केली जाणार आहे.
कोट
विना परवाना, विना बिल कामोत्तेजक औषधसाठा घरात लपवून ठेवला होता. येथे धाड टाकून तो जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
- मनीष गोतमारे, औषध निरीक्षक, अमरावती