अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मोहन खेडकर यांच्यावर बीसीयूडी संचालक अजय देशमुख यांची नियमबाह्य नियुक्ती केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांचा परदेश दौरा रद्द करण्यात यावा, अशी मागणी एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी फे्रजरपुरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. कुलगुरू मोहन खेडकर यांच्या कन्येचे गुणवाढ प्रकरण तसेच नुकत्याच उघड झालेल्या गुणवाढ प्रकरणाची चौकशी अद्यापही सुरु आहे. त्यातच काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असून त्यामध्ये कुलगुरूंचे स्पष्टीकरण येणे बाकी आहे. इतकेच नव्हे तर कुलगुरुंविरोधात पोलीस तक्रार सुध्दा झाली आहे. असे असूनही कुलगुरु दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जात असल्याची माहिती आहे. पोलीस कारवाईच्या भीतीने कुलगुरु देश सोडून पलायन करीत असल्याचा आरोप एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष अक्षय भुयार यांनी केला. गुणवाढ प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कुलगुरुंना देशाबाहेर जाण्याची परवानगी नाकारण्याची मागणी निवेदनातून पोलीस निरीक्षक खंडेराव यांच्याकडे करण्यात आली आहे.
कुलगुरूंचा परदेश दौरा रद्द करा
By admin | Updated: May 8, 2015 00:24 IST