लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : नव्या कार महाग झाल्याने अनेकजण आता सेकंड हँड कार खरेदीला पसंती देत आहेत. त्यामुळे जुनी वाहन विक्री करणाऱ्या ब्रोकरची संख्या वाढली आहे; मात्र आता ब्रोकरांना जुनी कार घेणे महागडी ठरणार आहे. कारण केंद्र सरकारच्या नव्या निर्देशानुसार सेकंड हँड कारवर आता १२ ऐवजी १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे; मात्र यासंदर्भात सूचना प्राप्त नसल्याची माहिती आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजस्थानच्या जैसलमेर येथे झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत जुन्या कार खरेदीवरील जीएसटीमध्ये मोठा बदल करण्यात आल्याचे सांगितले. जीएसटी कौन्सिलने आता जुन्या छोट्या कार आणि जुन्या इलेक्ट्रिक कार विक्रीवर १२ ऐवजी १८ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नोंदणीकृत विक्रेत्यांकडून वापरलेल्या कार खरेदी करणे आगामी काळात महाग पडणार आहे.
वैयक्तिक कार खरेदी किंवा विक्रीवर जीएसटी लागणार नाही. हा जीएसटी जुन्या वाहनाच्या एकूण मूल्याऐवजी नोंदणीकृत विक्रेत्याच्या मार्जिनवर लावला जाणार आहे.
पाच लाखांची कार चार लाखांच्या घरात ! जुनी कार खरेदी करताना जीएसटी हा व्यवहारावर लागणार आहे. समजा ५ लाख रुपयांची कार खरेदी केली आणि ४ लाख रुपयांना विकली तर या व्यवहारामध्ये संबंधित कार मालकाचे नुकसान होणार आहे. त्यामुळे त्याला कोणताही जीएसटी भरावा लागणार नाही.
रोज १०० वाहनांचे 'ट्रान्सफर' अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयात जुन्या वाहनांचे 'ट्रान्सफर' च्या नोंदी बघितल्या तर सरासरी १०० पेक्षा जास्त वाहनांचे व्यवहार होतात.
नव्या कारच्या किमती आवाक्याबाहेर कोरोनानंतर नव्या कारच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे अनेकजण जुन्या वाहन खरेदीकडे वळत आहेत
नव्या वर्षात जुनी कार महागली जुने वाहन खरेदी केल्यानंतर १८ टक्के जीएसटी लागणार आहे. याचा फटका ब्रोकरांना बसणार आहे. साहजिकच वाहन खरेदीनंतर जीएसटी भरावा लागेल. त्यामुळे अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.
"जुन्या वाहनाच्या विक्री व्यवहारावर जीएसटी आकारणे ही बाब अन्यायकारक आहे. नवी कार खरेदी करताना सुद्धा जीएसटी भरावा लागतो. ब्रोकरांवर हा अन्यायच आहे."- अब्दुल अशफाक, व्यावसायिक
"प्रत्येक जीवनावश्यक वस्तू, साहित्य खरेदीवर जीएसटी भरावाच लागतो. आता जुन्या वाहनावरही जीएसटी आकारणे म्हणजे ही शुद्ध फसवणूक आहे. यामुळे जुने वाहनही महाग होईल." - विकास डोंगरे, ग्राहक