एफडीएची कारवाई : धामणगावातील मेडिकल व्यावसायिकांचा प्रताप लोकमत विशेषअमरावती : बनावट बिलांद्वारे एक औषधी विक्रेता लाखोंच्या औषधी विक्री करीत असल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आला. अन्न व औषधी प्रशासन विभागाने हर्षिता मेडिकल एजन्सीचे संचालक प्रकाश कुचेरिया यांच्याविरुध्द धामणगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून संचालकाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्ह्यातील धामणगावात प्रकाश कुचेरिया यांचे हर्षिता मेडिकल एजन्सी हे प्रतिष्ठान आहे. त्यांचा औषधी विक्रीचा होलसेल व्यापार असून विदर्भातील अनेक ठिकाणी ते औषधींची विक्री करतात. नियमित तपासणीचा भाग म्हणून अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्र.ना. शेंडे व सहआयुक्त अ.ता. निखाडे यांच्या मार्गदर्शनात औषधी निरीक्षक बल्लाळ यांनी शुक्रवारी हर्षिता मेडिकला भेट देऊन औषधी विक्रीच्या बिलांची तपासणी केली. त्यामध्ये त्यांना एक लाखांच्या औषधी विक्रीचे २० बिले बनावट असल्याचा संशय आला. ती बिले पुलगाव येथील अभिनंदन मेडिकल स्टोअर्स अॅन्ड जनरल येथील असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी पुलगावला जाऊन अभिनंदन मेडिकल स्टोअर्सच्या संचालकाची चौकशी केली. तेव्हा त्या बिलांशी अभिनंदन मेडिकलचा काही संबध नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे औषधी निरीक्षक बल्लाळ यांनी तत्काळ दत्तापूर पोलीस गाठून प्रकाश कुचेरियाविरुध्द तक्रार नोंदविली. याप्रकरणात पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, १७७, ११९ अन्वये गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे. चार वर्षांपासून सुरू होता गोरखधंदाहर्षिता मेडिकलचे संचालक प्रकाश कुचेरिया हे चार वर्षांपासून या व्यवसायात आहे. त्यांनी यापूर्वीही बोगस बिले तयार करून बोगस डॉक्टर व अन्य मेडिकल स्टोअर्सना औषधी विक्री केली असावी, असा कयास व्यक्त केला जात आहे. धामणगाव तालुक्यात हा प्रकार उघड झाला असून वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथील औषधी विक्रेत्यांच्या नावाने बनावट बिले तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे विदर्भातील अनेक ठिकाणी बोगस बिले बनवून औषधी विक्री केली जात असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागपूर व अमरावती जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांच्या बिलाची तपासणी होणे आता गरजेचे झाले आहे. तसे पाऊल एफडीएने उचलणे आता आवश्यक झाले आहे. बोगस डॉक्टरांना औषधी विक्रीजिल्ह्यात अनेकदा बोगस डॉक्टर पकडण्यात आले त्यांच्याजवळून औषधीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या बोगस डॉक्टरांना औषधीचा पुरवठा करणारे कोण, हे एक कोडेच असून त्यांना बोगस बिलाद्वारे औषधीची विक्री केली जात असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मोठ्या रॅकेटची शक्यताविक्रेत्याने तीन महिन्यांत एक लाखांचा माल वर्धा जिल्ह्यातील पुलगावात विक्री केला. त्यामुळे अन्य शहरांतही अशा प्रकारचे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे.
बनावट बिलांद्वारे औषध विक्रीचा पर्दाफाश
By admin | Updated: March 13, 2016 00:05 IST