अंजनसिंगी : व्यापाऱ्यांनी येथील बैल बाजार भरविण्याचा केलेला प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी ठरला. अंजनसिंगी येथील बैलबाजार जिल्हा व राज्यातदेखील प्रसिद्ध आहे. तथापि, सध्या मिनी लॉकडाऊन लागल्यामुळे सकाळी ७ ते सायंकाळी ८ या वेळेत जमावबंदी आणि रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी लागू आहे. त्यामुळे जीवनावश्यक साहित्याची विक्री सोडून इतर सर्व व्यवसाय करण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व बाजार बंद करण्याचे आदेश आल्यामुळे धामणगाव रेल्वे येथील कृषिउत्पन्न बाजार समितीने बैल बाजार भरण्याच्या आवाराला कुलूप लावून पुढील आदेशापर्यंत बंदी आदेश काढला. मात्र, गेल्या दोन आठवड्यापासून दलालांनी बैलांचा बाजार आठवडी बाजाराच्या जागी सुरू केला. ७ एप्रिल रोजी बाजार भरताच स्थानिक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कुऱ्हा पोलीस ठाण्याला सूचना दिली. त्यावरून सहायक ठाणेदार जोशी व त्यांचे सहकारी तातडीने दाखल झाले आणि शेतकरी व व्यापाऱ्यांना या ठिकाणाहून निघून जाण्यास सांगितले.
अंजनसिंगी येथील बैलबाजार पोलिसांनी पाडला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST