बांधकाम विभागाची जागा भंगार विक्रेत्याच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:48 PM2018-05-15T22:48:37+5:302018-05-15T22:48:56+5:30
येथील जुने रेल्वे स्थानकासमोरील भागात रेल्वे पुलानजीकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अनेक वर्षांपासून भंगार विक्रेत्याने अतिक्रमण केले आहे. अतिशय मोक्याचा स्थळी दिवसा भंगाराचे दुकान अन् रात्री गैरकायदेशीर कामे, असा प्रताप येथे सुरू आहे. मात्र, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हा गंभीर प्रकार दिसू नये, हे आश्चर्य आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील जुने रेल्वे स्थानकासमोरील भागात रेल्वे पुलानजीकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अनेक वर्षांपासून भंगार विक्रेत्याने अतिक्रमण केले आहे. अतिशय मोक्याचा स्थळी दिवसा भंगाराचे दुकान अन् रात्री गैरकायदेशीर कामे, असा प्रताप येथे सुरू आहे. मात्र, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हा गंभीर प्रकार दिसू नये, हे आश्चर्य आहे.
रेल्वे पुलाजवळील बांधकाम विभागाचे कार्यालय फार जुने आहे. ही वास्तू जीर्ण झाल्याने या परिसराला अतिक्रमणाने वेढले आहे. या वास्तुकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमणधारकांचे फावत आहे. सन १९६६-६७ मध्ये निर्मित रेल्वे पुलाच्या खालील भागातून रेल्वे स्टेशन ते राजापेठ दरम्यान १०० मीटर रूंदीचा वाहतुकीसाठी रस्ता आहे. त्याकाळी पादचाºयांना ये-जा करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने स्वतंत्र रस्ता होता. मात्र, आता त्यावर अतिक्रमण केले आहे. कालांतराने या वास्तुकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. ही बाब भंगार विक्रेत्याने हेरली. ती वास्तू ताब्यात घेऊन येथे भंगार दुकान थाटले. जणू ही वास्तू आपल्या मालकीची असल्यागत या भंगार दुकानदाराने जागेवर ताब्यात मिळविला.
रेल्वे स्थानकाजवळ भंगार दुकान कशासाठी?
रेल्वे स्थानकाजवळ भंगार दुकान थाटण्यामागे बरेच काही दडले आहे. यापूर्वी रेल्वे स्थानक निर्मितीचे कामे सुरू असताना मोठ्या प्रमाणात लोखंडी साहित्य, रेल्वे रूळ चोरीच्या घटना घडल्या आहेत. असे असताना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना हाकेच्या अंतरावर थाटण्यात आलेल्या भंगार दुकानाबाबत संशय येऊ नये, हा संशोधनाचा विषय आहे.
घटनास्थळी भेट देऊन वास्तूची पाहणी केली जाईल. या जागेवर विधायक कामे हाती घेण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेऊ. येथे बांधकाम विभागाचे जुने सेक्शन इंजिनीअरिंगचे कार्यालय असल्याची नोंद आहे. लवकरच ही वास्तू ताब्यात घेतली जाईल.
- सदानंद शेळके, कार्यकारी अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती