एसबीआय उठली शेतकऱ्यांच्या जिवावर : जिल्हाधिकारी करणार कारवाईगजानन मोहोड - अमरावतीदोन्ही किडन्या निकामी झाल्याने वडील तीन वर्षांपूर्वी गेले अशा परिस्थितीत धीर न सोडता माउलीने काबाडकष्ट करुन संसार सांभाळला. तीन वर्षांपासूनची नापिकी, स्टेट बँकेसह खासगी सावकाराचे कर्ज, यंदाचे सोयाबीनही उद्ध्वस्त झाले. जगावं कसं? या विवंचनेत या शेतकरी महिलेने शेतामधील विहिरीत आत्महत्या केली. निकषप्राप्त प्रकरण असल्याने मंगळवार ९ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचा धनादेश मिळाला. जमा करायला नेला तर बँकेने मृताच्या नावाचे कर्ज कापून घेतले. जिल्हा दुष्काळग्रस्त आहे. कर्जवसुलीची सक्ती न करण्याचे शासनाने बँकांना सूचना केल्या आहेत. आहे त्या कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचनाही शासनाने बँकेला दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे कर्जदार शेतकरी परिवाराप्रती असणाऱ्या सहानुभूतीचे धोरणाचे लक्तरे वेशीवर टांगत मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा निंदणीय प्रकार तिवसा येथे घडला आहे. समाजाच्या सर्व स्तरावरुन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. विभागीय उपायुक्तांनीही झाल्या प्रकारात खेद व्यक्त करुन कारवाईचे आश्वासन दिले आहे. सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरु असल्याने वऱ्हाडात शासन योजनेचे धिंडवडे काढणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात शासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यामधील तिवसा तालुक्यातील महिला शेतकरी यशोदा देवेंद्र कांबळे (३८) यांनीे २५ आॅगष्ट २०१४ रोजी स्वत:च्या शेतामधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्याग्रस्त महिलेच्या अनुदानातून कर्जकपात
By admin | Updated: December 10, 2014 22:49 IST