प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्वसामान्यांच्या सोयीसाठी त्या त्या भागात एक पोलीस ठाणे आहे. मात्र, तक्रार नोंदवून घेण्याआधी गुन्हा कुणाच्या हद्दीत घडला, नेमका कुठे घडला, याबाबत विचारणा केली जाते. तो गुन्हा दुसऱ्या ठाण्याच्या हद्दीत घडला असल्यास तक्रारदाराला तिकडे पाठविले जाते. शहरातील १० पोलीस ठाण्यांचा परिसर एकमेकांना लागून असल्याने हा संभ्रम निर्माण होतो. मात्र, ग्रामीण भागातील ३१ पोलीस ठाणी दूर अंतरावर आहेत. त्यामुळे हद्द बदल्यास तक्रारकर्त्याला तक्रार नोंदविण्यासाठी दूरचे अंतर गाठावे लागते. एकट्या वरूड तालुक्यात वरूडसह शेंदूरजनाघाट व बेनोडा, चांदूरबाजार तालुक्यात चांदूरबाजारसह शिरजगाव व ब्राह्मणवाडा थडी, भातकुली तालुक्यात भातकुलीसह खोलापूर या ठाण्यांच्या सीमा एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे अनेक जणांना या पोलीस ठाण्यातून त्या पोलीस ठाण्यात नाहकच येरझारा माराव्या लागतात. प्रत्यक्षात सीआरपीसीच्या कलम १५४ प्रमाणे तक्रारदार ज्या पोलीस ठाण्यात गेला, तेथेच गुन्हा दाखल करणे, बंधनकारक आहे. मात्र, अपवादात्मक स्थितीत काही ठिकाणी तसे होताना दिसत नाही. त्याचा त्रास मात्र पोलीस ठाण्याशी संबंधित कामे घेऊन नागरिकांना सहन करावा लागत आहे.
गावे दुसऱ्याच पोलीस ठाण्यात पूर्वी भातकुली तालुक्यातील अनेक गावे खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेली होती. मात्र, पोलीस भातकुली ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर ती गावे भातकुली पोलीस ठाण्याशी संलग्न करण्यात आली आहे. त्यामुळे आजही अनेक लोक तक्रार देण्याकरिता खोलापूर पोलीस ठाण्यात धाव घेत असल्याचे चित्र आहे.
हद्दीचा संभ्रमअंजनसिंगी हे गाव धामणगाव रेल्वे तालुक्यात आहे. ते गाव तिवसा तालुक्यातील कुर्हा या पोलीस ठाण्याशी संलग्न आहे. त्यामुळे कुर्हा पोलीस ठाण्यात गेल्यास तक्रार नोंदवून घेण्यापूर्वी घटनास्थळाची विचारणा केली जाते.
लगतची तीन गावे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातभातकुली तालुक्यातील कुंड सर्जापूर, खारतळेगाव व अळणगाव ही तीनही गावे एकमेकांशेजारी आहेत. मात्र, अळणगाव भातकुलीत, कुंड सर्जापर नागपुरीगेटमध्ये तर खारतळेगाव वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे पोलिसांसोबतच तक्रारकत्यांसमोरदेखील हद्दीचा प्रश्न निर्माण होतो.