धारणी : तालुक्यात अतिरिक्त व्याजदरावर कर्ज देण्याचा प्रकार विनापरवानाधारक सावकारांनी चालविल्याची माहिती पुढे आहे.अवैध सावकरांकडून महिन्याकाठी ५ ते २० टक्के दराने कर्जाची वसुली केली जात असून यात सामान्य वर्ग भरडला जात आहे. गरजा भागविण्यासाठी परवानाधारक सावकरांकडे गेल्यास जाच, अटी व जामीन म्हणून दागिने, शेती व घराचे कागदपत्र ठेवावे लागतात. त्यामुळे तारण न ठेवता बोगस सावकारांकडून अधिक व्याजदरावर कर्जाचे वाटप केले जात आहे. अशा सावकारांकडे कोणताही परवाना नसतो. केवळ ओळखीच्या भरवशावर भक्कळ व्याज आकारून गरजूंना कर्ज दिले जात आहे. अशा व्यवहाराची कोणतीही लेखी दस्त नसल्याने दोन्ही पदावर याचा ताण असतो. मात्र घेणाऱ्याला तातडीने पैशाची आवश्यकता असल्याने तो व्याजाची पर्वा न करता तात्पुरते काम काढण्यासाठी राजी होतो. मात्र अशा रकमेची परतफेड करताना मात्र दमछाक होते. धारणी शहराच्या गल्लीबोळातही अवैध सावकारांचे जाळे पसरले आहे. उसनवार घेणाऱ्यांची मात्र भंबेरी उडत आहे. अशा सावकारांचे व्याज आठवडी १० टक्केपर्यंत असल्याची माहिती आहे. प्रसंगी मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करण्याऱ्यांकडून आठवडी २० टक्केपर्यंत व्याज वसूल केला जात आहे. याकरिता रेशनकार्ड तारण म्हणून ठेवले जात आहे. तालुक्यात २० अधिकृत सावकार आहेत. ज्यांच्याकडे परवाना आहेत, अशा वैध सावकारांमध्ये सोनार वर्गाचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)
धारणी तालुक्यात बोगस सावकारांचा सुळसुळाट
By admin | Updated: December 29, 2014 03:00 IST