धारणी : स्कॉर्पियो गाडीत तलवारीसह आलेल्या सहा तोतया पत्रकारांनी दारु पिऊन धिंगाणा घातला व २५ हजार रुपये खंडणीची मागणी केल्याची घटना नुकतीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदिवासी शाळा भोकरबर्डी येथे घडली. या घटनेची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. एमएच ०४-बीएन-४३८५ अध्यक्ष युवाशक्ती छावा संघटना एसे फलक लागलेली स्कॉर्पियो गाडी राष्ट्रसंत तुकडोजी आदिवासी आश्रम शाळा भोकरबर्डी येथे आली. गाडीतून ५-६ लोक उतरले. पत्रकार आहोत २५ हजार रुपये द्या नाही तर शाळा बंद करतो, अशा प्रकारची धमकी दिली. आपण दारु पिऊन आहात म्हणून शाळा चेक करु देणार नाही, असे अधीक्षक सुरेश बोथे यांनी म्हटले असता त्यांना शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली व सकाळी पुन्हा येऊ, असे म्हणून निघून गेलेत. रविवारी सकाळी ९.३० वाजता ते पुन्हा गाडी घेऊन आले व पुन्हा धमक्या देणे सुरू केले. याची माहिती जि.प. सदस्य श्रीपाल पाल यांना देण्यात आली. परंतु त्यांच्या येण्यापूर्वीच ते पळून गेले. तेव्हा श्रीपाल पाल यांनी सदर वाहनाचा पाठलाग केला. स्कॉर्पियो गाडी धूम स्टाईलने हरिसाल, चिखली, तारुबांदा मार्गे अकोटकडे पळून गेले. हरिसालहून कोहा वनविभाग येथे वायरलेस करुन सदर वाहनाचे क्रमांक देण्यात आले ते वाहन तेथे पोहोचताच सर्वांनी जंगलाकडे पळ काढला. त्या गाडीची पाहणी केली असता आतमध्य एक तलवार मिळाले. याची तक्रार मुख्याध्यापक येणोरकर व अधीक्षक सुरेश बोथे यांनी पोलिसात दिली असून वाहने कोहा नाक्यावर उभे होते तर पोलिसांची कार्यवाही सुरू होती. तक्रारीत गुणवंत हरणे, जिल्हाध्यक्ष युवा लोक जनशक्ती पार्टी अमरावती व इतरांविरुद्ध उल्लेख करण्यात आले आहे. या घटनेने आश्रम शाळा प्रशासनात खळबळ उडाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
दारू पिऊन तोतया पत्रकारांचा भोकरबर्डीत धुमाकूळ
By admin | Updated: August 17, 2015 00:09 IST