अमरावती : महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या यावेळी भाजपचे शिरिष रासने यांच्याकडे सोपविण्यात आल्या. गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभापतीपदाचे निवडणुकीत त्यांनी सहा विरुद्ध नऊ मतांनी विजय मिळविला. पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल होते.
महापालिकेतील स्थायी समितीच्या १६ सदस्यीय सभागृहात भाजपचे नऊ सदस्य असल्याने सभापती त्यांचाच होणार, ही बाब स्पष्ट होती. ही शेवटची टर्म असल्याने सभापतीपद भाजपमधील कोणत्या गटाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सकाळी १० वाजता नागपूरहून शिरिष रासने यांच्या नावाचा संदेश आला. त्यामुळे दोन्ही माजी पालकमंत्री गटातील इच्छुकांध्ये नाराजीचा सूर उमटला.
महापालिकेतील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात गुरुवारी सकाळी ११ वाजता सभेला सुरुवात झाली. पीठासीन अधिकारी शैलेश नवाल यांनी उमेदवारी अर्जाची माघार घेण्यासाठी १० मिनिटांचा अवधी दिला. भाजपचे शिरिष रासणे व विरोधकांतर्फे एमआयएमचे अब्दूल हुसेन मुबारह हुसेन असे दोन अर्ज होते. यामध्ये हात उंचावून मतदान करण्यात आले असता. एमआयएमचे उमेदवाराला सहा व रासणे यांना नऊ मते पडल्याने रासने यांना विजयी घोषित करण्यात आले. सभेमध्ये बसपाचे चेतन पवार अनुपस्थित होते. शिरिष रासणे यांच्या उमेदवारी अर्जावर इच्छुकांनी सुचक व अनुमोदक होण्यास नकार दिल्याची आहे. निवडणूक प्रक्रियेत नगरसचिव मदन तांबेकर, नंदकिशोर पवार, नीलेश बाविस्कर, सागर होले आदिंचे सहकार्य लाभले.
बॉक्स
आजी, माजी आमदार गटात नाराजी
सद्यस्थितीत महापालिकेच्या तिन्ही महत्त्वपूर्ण पदांवर मूळच्या भाजप पदाधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे. यामध्ये महापौर चेतन गावंडे, सभागृहनेतेपदी तुषार भारतीय व आता स्थायी समितीचे सभापतीपदी शिरिष रासणे यांचा समावेश आहे. पुढील वर्ष हे निवडणुकांचे असल्यामुळे ही खेळी करण्यात येऊन सर्व सूत्रे एका व्यक्तीकडे सोपविण्यात आल्याचे दिसून येते. यात माजी आमदार सुनील देशमुख व आमदार प्रवीण पोटे गटाला स्थान न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये कमालीचा नाराजीचा सूर दिसून आला.