आंदोलन, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी
अमरावती : येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निधी इतरत्र वळविल्याने सत्ताधारी भाजप व महाविकास आघाडीत संघर्ष पेटला आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुधवार, २७ जानेवारी रोजी भाजपक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमारे निर्दशने करीत शासनाचे याकडे लक्ष वेधले. यावेळी भाजपने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे निवेदनाव्दारे केली आहे.
अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे, याकरिता भाजपचे शहराध्यक्ष किरण पातुरकर यांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय कृषी समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून सातत्याने वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच अमरावती येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय मागे पडला. सदरचा निधी सिंधुदूर्ग येथे वळवून तोंडाला पाने पुसण्यात आली. ही बाब लक्षात येताच भाजपने गाडगेबाबा समाधी मंदिरासमोर सदबुध्दी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले. अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी अगोदरची असताना महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारच्या कार्यकाळात मार्गी लागलेला हा विषय जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कोकणातील सिंधूदुर्ग, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याला प्राधान्य दिले. त्या ठिकाणी निधी सुध्दा दिला. परंतु अमरावतीला यातून डावलले हा अन्याय असून, याविरुद्ध भाजपने आक्रमक भूमिका घेत तातडीने अमरावतीचे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून डीनची नियुक्ती करावी, तसेच आवश्यक पदे निर्माण करावीयत, शैक्षणिक सत्र २०२१-२२ करिता अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतील, असे नियोजन करण्याची मागणी केली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष किरण पातुरकर, महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसूम साहू, माजी आमदार सुनील देशमुख, माजी मंत्री अनिल बोंडे, सुरेखा लुंगारे, जयंत ङेहनकर, अविनाश चौधरी, गजानन देशमुख, मंगेश खोंडे, अरविंद खांडेकर, सुनील काळे, रवींद्र खांडेकर आदी उपस्थित होते.