राजकमल चौकात आंदोलन; सरकारच्या दडपशाहीचा निषेध
अमरावती : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेत सोमवारी मोठा गदारोळ झाला. या गदारोळानंतर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. या कारवाईचे मंगळवारी सभागृहाबाहेर पडसाद उमटले. भाजपने आक्रमक भूमिका घेत विविध ठिकाणी आंदोलन सुरू केले. महाविकास आघाडी सरकारच्या धोरणाविरोधात येथील राजकमल चौकात भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने महाविकास आघाडी सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळून आपला संताप व्यक्त केला.
भाजपच्या आमदारांनी ओबीसी आरक्षणाबाबत सरकार करीत असलेल्या मनमानी कारभारावर आवाज उठविला. म्हणून या सरकारने थेट निलंबनाची कारवाई केल्याचा आरोप करीत भाजप युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आला. ओबीसी आरक्षणावर आक्रमक झालेल्या भारतीय जनता पार्टीचे आमदारांचा आवाज दाबण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने १२ आमदारांचे निलंबन केल्याचा आरोप करीत या कारवाईचा भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती शहर-जिल्हातर्फे भाजपा शहर अध्यक्ष किरण पातूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या सूचनेनुसार व भाजयुमो शहर अध्यक्ष प्रणित सोनी यांच्या नेतृत्वात राजकमल चौकात महाविकास आघाडी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला व सरकारविरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. लवकरात लवकर भाजपच्या बाराही आमदारांच्या निलंबनाची कारवाई रद्द करावी, अशी मागणी भाजयुमाेतर्फे करण्यात आली.
आंदोलनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष बादल कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष शुभम वैष्णव, संगम गुप्ता, प्रतीक इंगळे, तुषार चौधरी, सूरज जोशी, सचिव तुषार अंभोरे, रोहित काळे, कर्ण धोटे, शुभ साहू, दीपेश रीछारिया, अखिलेश खडेकर, कार्तिक पेशकर, विद्यार्थी आघाडी संयोजक जयेश गायकवाड, सहसंयोजक धवल पोपट, सौरभ किटुकले, अनंता गावंडे, कुणाल सोनी, अभिषेक रहाटगावकर व भाजयुमोचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.