लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्यालयापुढील फलकाच्या जाळपोळीचे प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी भाजपने राजापेठ पोलीस ठाण्यापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. राजकमल चौकात शहर कोतवाली व राजापेठ बसस्थानक चौकात राजापेठ पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. ती संधी हेरून भाजयुमो शहराध्यक्ष तथा नगरसेवक प्रणीत सोनी व अन्य कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर प्रतीकात्मक दहन केले. दरम्यान, मंगळवारी दुपारी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किरण पातूरकर यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी शिवसेना, युवा सेेनेचे पदाधिकारी पराग गुडधे, सुनील राऊत, श्याम धाने, वैभव मोहोकार, सचिन ठाकरे व १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास पराग गुडधे व अन्य शिवसैनिकांनी भाजपच्या राजापेठ स्थित कार्यालयात जाळपोळीचा प्रयत्न केला. त्यांच्याजवळ पेट्रोलदेखील होते, असे पातूरकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
गुन्हा दाखल होईपर्यंत भाजपजन ठाण्यातमाजी मंत्री अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, महापौर चेतन गावंडे, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, शहराध्यक्ष किरण पातूरकर, पक्षनेता तुषार भारतीय यांनी दुपारी १२ च्या सुमारास राजापेठ ठाणे गाठले. जाळपोळ करणाऱ्या शिवसैनिकांविरुद्ध गुन्हे व अटकेची मागणी बुलंद केली. यावेळी पक्षाचे नगरसेवक उपस्थित होत्या. ठाणेदार मनीष ठाकरे भाजपजनांना सामोरे गेले.
एसीपींनी सांभाळला मोर्चा : भाजपकडून प्रत्युत्तराच्या शक्यता गृहीत धरून राजकमल चौकात कोतवालीच्या ठाणेदार नीलिमा आरज, तर राजापेठ स्थानक चौकात एसीपी भारत गायकवाड यांनी मोर्चा सांभाळला. या चौकात उपायुक्त शशिकांत सातव यांनीदेखील धावती भेट दिली.