सद्बुद्धी धरणे : महाविकास आघाडी सरकारचे वेधले लक्ष
अमरावती : येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निधी इतरत्र वळविण्यात आल्याने सत्ताधारी भाजप व महाविकास आघाडीत संघर्ष पेटला आहे. त्याच पार्श्वभूमीवर संत गाडगे महाराज समाधी मंदिर गाडगेनगर येथे भाजपाकडून सद्बुद्धी आंदोलन सोमवार २५ जानेवारी रोजी करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून अमरावती येथे तातडीने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी भाजपाने महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे.
अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे याकरिता भाजपचे शहराध्यक्ष किरण पातुरकर यांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय कृषी समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून सातत्याने वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच अमरावती येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय मागे टाकण्यात आला. सदरचा निधी सिंधुदुर्ग येथे वळवून तोंडाला पाने पुसण्यात आली. ही बाब लक्षात येताच भाजपने गाडगेबाबा समाधी मंदिरासमाेर सद्बुद्धी आंदोलन करून याकडे सरकारचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी अगोदरची असताना महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारच्या कार्यकाळात मार्गी लागलेला हा विषय जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कोकणातील सिंधुदुर्ग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याला प्राधान्य दिले. या ठिकाणी निधीसुद्धा दिला. परंतु अमरावतीला यामधून डावलले हा अन्याय असून, या अन्यायाविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत तातडीने अमरावतीचे वैद्यकीय महाविद्यालय मंज़ूर करून या ठिकाणी डीनची नियुक्ती करावी, तसेक आवश्यक पदे निर्माण करावीत, शैक्षणिक सत्र २०२१-२२ करिता अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल असे नियोजन करावे, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. यावेळी आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष किरण पातुरकर, महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहू, तुषार भारतीय, सुरेखा लुंगारे, जयंत ङेहनकर, अविनाश चौधरी, गजानन देशमुख, मंगेश खोंडे, अरविंद खांडेकर, सुनील काळे, रवीद्र खांडेकर आदीसह भाजपाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.