शेतात प्रसूती झालेल्या चिमुकल्यांसह मातेला वाचविण्याची धडपड, न्यायालयाच्या फटक्यानंतरच तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती
फोटो कॅप्शन - शेतातील झोपडीत प्रसूत महिलेला अर्धांगवायूमुळे उचलून नेताना पती
लोकमत विशेष
चिखलदरा : तालुक्यातील भांद्री येथे शेतातील झोपडीत बुधवारी सकाळी ८ वाजता आदिवासी महिलेची प्रसूती झाली. कमी दिवसाच्या बाळाला तिने जन्म दिला. अर्धांगवायूने पीडत महिलेसह कमी वजनाच्या चिमुकल्याला वाचविण्यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे मेळघाटातील विविध दवाखान्यांमध्ये बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञांची नियुक्ती न्यायालयाने फटकारल्यानंतर मंगळवारी तडकाफडकी करण्यात आल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोमल प्रकाश बेठेकर (२०, रा. भांद्री) ही अर्धांगवायूने पीडित महिला बुधवारी सकाळी ८ वाजता शेतातील झोपडीत प्रसूत झाली. सातव्या महिन्यातच प्रसूती झाल्यामुळे कमी वजनाचे बाळ जन्माला आले. सलोना प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बिहाली उपकेंद्रात भांद्री गावाचा समावेश आहे. बिहाली येथील परिचारिका संगीता डाखोडे, एमपीडब्ल्यू अनिल सुरत्ने, भुलोरीचे प्रवीण अवघड, वासुदेव येवले आदींनी त्या महिलेला शेतातून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात व तेथून जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे माता-मुलावर उपचार होत असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली.
------------------------
कमी वजनाच्या बाळाचा जन्म?
मेळघाटात गर्भधारणेपासून तर जन्मापर्यंत व जन्मल्यानंतर सहा वर्षांपर्यंत बाळासह गर्भवती व स्तनदा मातांना पूरक पोषण आहार दिला जातो. कमी वजनाच्या बाळाचा जन्म हा कुपोषणाच्या श्रेणीत मोडत असल्यामुळे त्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना योग्य रीतीने राबविल्या जात आहे किंवा नाही, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
---------------
पावसाळ्यात १५ दिवस नियुक्ती, महत्त्वाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपजिल्हा रुग्णालयात कुपोषित बालकांसह जलजन्य आजारांची लागण होऊ नये, यासाठी प्रत्येकी पंधरा ते वीस दिवसांसाठी बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येते. जून महिन्यात केली जाणारी ही नियुक्त मंगळवारी केली गेली. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांअभावी बालमृत्यू होत असताना आरोग्य यंत्रणेने न्यायालयाच्या आदेशानंतर केलेली नियुक्ती संताप व्यक्त करणारी ठरली.