महसूल विभागाचा निर्णय : शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी उपक्रमअमरावती : तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र आणि दुष्काळ शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्न कमी या विरोधाभासामुळे कर्ज वाढते. परिणामी विदर्भ व मराठवाड्यात नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हास्तरावर ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्याचा निर्णय राज्याच्या महसूल विभागाने शुक्रवारी घेतला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासनस्तरावरून अनेक उपक्रम वेळोवेळी राबवीत असताना शासन यंत्रणेला यश आलेले नाही. यासाठी शासनाने विशेष मदतीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. नैराश्य आलेल्या शेतकऱ्यांची आत्महत्येची मानसिकता घालवून त्यांचे मनोबल उंचावण्याकरिता ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्यात येणार आहे. सुरुवातीला यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात हा प्रयोग राबविण्यात येईल व नंतर हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून शासन हा उपक्रम राबविणार आहे.या अभियानांतर्गत त्रस्त शेतकरी कुटुंब ओळखण्यासाठी ग्रामस्तरीय समितीमार्फत सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची यादी बनविण्यात येणार आहेत. त्यांना शेतीविषयक शासकीय योजना तसेच कमी खर्चाच्या कोरडवाहू शेतीबाबत माहिती देण्यात येईल. सामूहिक विवाहाचे महत्त्व, व्यसनमुक्तीबाबत भजन, कीर्तने व पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. त्रस्त शेतकरी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे समुपदेशनही करण्यात येणार आहे. बहुतांश शेतकरी कुटुंबांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)लोकमतशुभवर्तमान
आत्महत्या रोखण्यासाठी ‘बळीराजा चेतना अभियान’
By admin | Updated: July 28, 2015 00:27 IST