फेरनिवड : शेतकऱ्यांच्या कार्यासाठी गौरव अमरावती : जयपूर येथे आयोजित भारत कृषक समाज गव्हर्निंग बॉडी तसेच कौन्सिल सभासदंच्या अधिवेशनात भारत कृषक समाजाचे विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे यांना त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राजस्थानचे मुख्यमत्री अशोक गहलोत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात अजयवीर जाखड यांची पाच वर्षांकरिता भारत कृषक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली. अधिवेशनामध्ये विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरीत आरक्षण देणे, स्वामीनाथन आयोग तत्काळ लागू करणे, पेरपत्रकानुसार पीकविमा योजना लागू करणे, ९० दिवसांच्या आत नुकसान भरपाई देणे, ब्रिटिशकालीन आणेवारी पद्धतीत सुधारणा करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. व्ासंत लुंगे हे मागील २५ वर्षांपासून भारत कृषक समाजामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेक अधिवेशांचे आयोजन केले असून राष्ट्रीयस्तरावर संघटनात्मक व धोरणात्मक उपक्रमही ते राबवीत असतात. या कार्याबद्दल त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. यावेळी मंचावर सामाजिक केंद्रीय मंत्री माधवसिंग, राजस्थानचे माजी मंत्री जितेंद्र प्रसदा, आदींसह विदर्भातून शशांक देशमुख, दीपक लोखंडे, किशोर गुल्हाने, आशुतोष गुल्हाने, पुरूषोत्तम देशमुख, राजू निंभोरकर, अरविंद गायकवाड, सुरेश पेटे, जयंत कडू, सुनीता येरणे, धुलीराम शेंडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भारत कृषक समाजाचे वसंत लुंगे पुरस्कृत
By admin | Updated: October 19, 2016 00:18 IST