लक्षवेध; विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, वारकऱ्यांचा एल्गार
अमरावती : राज्य सरकारकडून पंढरपुरला जाणाऱ्या वारकऱ्यांवर दबाबतंत्राचा वापर करून साडेसातशे वर्षाची परंपरा मोडीत काढण्याचा शासनाचा डाव असून तो मोडीत काढण्यासाठी १७ जुलै रोजी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच वारकरी सेवा मंडळाच्यावतीने जिल्हा कचेरीसमाेर भजन आंदोलन करण्यात आले.
पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना ठिकठिकाणी रोखण्यात येत असून, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला जात आहे. एकप्रकारे शासनाकडून दबाबतंत्राचा अवलंब करण्यात येत आहे. ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने जुलमी राजवट सुरू केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. राज्य सरकारने हा प्रकार तातडीने बंद करावा, याशिवाय ज्येष्ठ कीर्तनकार बंड्यातात्या कराडकर यांच्यासह वारकऱ्यांना सन्मानपूर्वक मुक्त करावे. त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे. आषाढी एकादशीपासून राज्याच्या विविध भागात तसेच विविध मठांमध्ये चालणारे चतुर्मास सेवा व मंदिरातील पारंपरिक उत्सव, वारकरी सप्ताह, कीर्तन, प्रवचन, दर्शन यावरील प्रतिबंध हटविण्यात यावे. ज्याप्रमाणे कार्यालयात, बस प्रवासात, थिटरमध्ये किंवा हाॅटेल मध्ये ५० टक्के उपस्थितीची मान्यता दिली आहे, त्यानुसार परवानगी द्यावी, यांसह अन्य मागण्या आंदोलकांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केल्या. यावेळी आंदोलनात जिल्हाध्यक्ष अनिल साहू, विहिंपचे विभाग संयोयक संतोष गहेरवाल, जिल्हा महामंत्री बंटी पारवानी, महाराष्ट्र वारकरी महामंडळाने अध्यक्ष ह.भ.प. श्यामबाबा निचत, शालिकराम खेडकर, ह.भ.प. रायजीप्रभू शेलोटकर, सुभदा पोतदार, अर्चना देवडिया, विपीन गुप्ता, संजय नागपुरे, शरद अग्रवाल, राजीव देशमुख, रूपेश राऊत, दिनेश सिंह, चेतन वाटणकर, उमेश मोवाये, इंद्रपाल गेमनानी, निलेख महाराज, बबन महाराज, श्रीराम कुचे, मोहन महाराज वानखडे, योगेश मोटघरे यांच्यासह शिवराय कुलकर्णी, सत्यजित राठोड, निर्मल बजाज, मनीष जाधव, विशाल कुलकर्णी, कैलास दंदे, धनराज ठाकूर, राहुल पवार, आशिष बोधानी आदींनी केली आहे.