मनीष तसरे लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन वर्षापासून सततच्या निर्बंधांमुळे लग्नसोहळ्यावर विरजण पडले होते. त्यातच लग्नसोहळ्यावर विसंबून असणाऱ्या व्यावसायिकांचेसुध्दा व्यवसाय डबघाईस आले होते. काेरोना संक्रमणाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या निर्बंधांमुळे मंगल कार्यालय, लॉन्सचा व्यवसाय पूर्णत: चौपट झाला आहे. थोडी उसंत मिळताच संक्रमणाचा वेग वाढल्यामुळे शासनाला नाईलाजाने पुन्हा निर्बंध लावावे लागले. त्यामुळे मंगल कार्यालय व्यावसायिकांवर पुन्हा संकट ओढावले होते.आता संक्रमण ओसरत असल्याचे पाहून सोमवारी महाराष्ट्र शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असल्यामुळे लग्नसोहळ्यांकरिता हॉल, लॉन्स व पटांगणातील क्षमतेच्या २५ टक्के वा जास्तीत जास्त २०० आमंत्रितांना परवानगी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मंगल कार्यालये व नियोजित विवाह सोहळे असलेल्या कुटुंबीयांमध्ये उत्साह संचारला आहे. नातेवाईकांना सोयीचे होईल अशा ठिकाणी विवाह सोहळ्याचे आयोजन करता येणार असल्याने लग्न समारंभात उत्साह दिसून येणार आहे.
फेब्रुवारीतील लग्नाचे मुहूर्त फेब्रुवारी — ५,६,७,१०, १६,१७,२१, २४,२५,२८मार्च — १४,२३,२५,२६,२८,२९
वधू-वर पित्यांची चिंता मिटलीलग्नात नातेवाइकांना बोलावले तर आनंद वाटतो, मात्र निर्बंधामुळे आम्हाला चिंता वाटायला लागली होती. मात्र आता सूट मिळाल्याने बरे झाले. - रमेश तायडे (वधूपिता )
निर्बंधामुळे ५० लोकांमध्ये लग्न कसे करायचे हाच प्रश्न आम्हाला पडला होता. कुणाला बोलावयाचे कुणाला नाही याचे गणितच जुळत नव्हते. आता २०० लोकांची परवानगी मिळाल्याने बरे झाले आहे. -प्रकाश गतफणे, (वरपिता )
मंगल कार्यालयात २५ टक्के अथवा २०० जण महाराष्ट्रातील संक्रमण ओसरत असल्याने शासनाने सोमवारी अनेक निर्बंध शिथिल केले असून,लग्नसोहळ्यांना हॉल,लॉन्स व पटागंणातील क्षमतेच्या २५ टक्के वा जास्तीत जास्त २०० आमंत्रितांना परवानगी जाहीर केली आहे.
गेल्या दोन वर्षापासून मंगल कार्यालय व्यावसायिकांवर फार वाईट दिवस आले आहे. ५० लोकांमध्ये लग्न सोहळा पार पाडतांना बऱ्याच लोकांनी मंगल कार्यालयाकडे येऊनसुध्दा पाहिले नाही, आता निर्बंध हटविल्याने लोक मंगल कार्यालयात येऊन लग्न करतील.-आकाश देशमुख, (मंगल कार्यालय संचालक)
विवाह सोहळ्यांच्या आयोजनावर ज्यांचे रोजगार होते, त्यांच्यावर गेल्या दोन वर्षात अत्यंत वाईट दिवस आले आहेत. निर्बंधांमुळे व्यवसाय बुडाले नाही. आता निर्बंध हटल्यामुळे व्यवसाय होतील, अशी अपेक्षा आहे. -अमोल देशमुख, (मंगल कार्यालय चालक)