कर भरतो, सुविधा द्या : अनुराग कॉलनी, आयश्री, धनश्री, विश्वशांती, गुणवंत, घनश्याम, जानकीनगर समस्याग्रस्तअमरावती : मागील १० वर्षांपासून या परिसरातील रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’ आहे. कधी डागडुजी, दुरूस्ती झालेली नाही. पावसाळ्यात तर फार बिकट अवस्था, ठिकठिकाणी डबके साचतात, वाहने घसरतात, स्कूल बसेस येत नाहीत, रस्त्यापर्यंत चिमुरड्यांना पोहोचवावे लागते. एक नाही अशा शेकडो समस्या या परिसरात आहेत. नगरसेवक या भागाकडे कधीच फिरकत नाही. गाव, खेड्यातले रस्ते, नाल्या यापेक्षा कितीतरी पटीने बरे आहेत. आम्ही कर भरतो, आम्हाला सुविधा हव्यात, असा या परिसरातील संतप्त नागरिकांचा सवाल आहे. बहुतेक ठिकाणी नाल्या नाहीत, ज्या आहेत त्यांची अवस्था दयनीय आहे. नाल्या सफाई कधी होत नाही, सफाई कामगार या परिसरात कधी पाहिला नाही. घरालगत पाणी मुरते, तेच पाणी बोअरमधून येते, सांडपाण्याची डबकी साचली आहे. यामुळे मच्छरांचा उच्छाद आहे. आरोग्य समस्या निर्माण होत आहे. काही भागात नळ नाहीत. आहे तिथे नळाला पाणी येत नाही. पाईपलाईन चुकीच्या पद्धतीने टाकल्याने नागरिकांना मन:स्ताप होतो. पाण्याचं बील फुकट भरावे लागते. मूळ ले-आऊटच चुकीच्या पद्धतीचे आहे. आोपन स्पेसमध्ये बगीच्या नाही. मुलांना खेळायला क्रीडांगण नाहीत. ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीही सुविधा नाही. महिलांनी सामूहिकरीत्या कार्यक्रम करायला हॉल नाही. कच्चे रस्ते असल्याने आॅटो येत नाही.महापालिकेची उद्यान, बगीच्या, रुग्णालय, शाळा, वाचनालय अशी कुठलीही सुविधा या परिसरात नाही. मैदानात काटेरी झुडूपे वाढली आहे. रस्त्यावर कधीही मुरूम टाकल्या गेला नाही. महापालिकेने आजवर एकही झाड लावली नाही, स्ट्रीट लाईट रात्री उशीरा केव्हातरी लागतो, बंद पडला तर कित्येक दिवस दुरुस्त केल्या जात नाही, रात्री अंधार असतो. त्यामुळे महिलांना असुरक्षित वाटते. साफसफाई केली जात नसल्याने भीतीचे सावट आहे. परिसरातील नाल्याची सफाई कधीच केली नाही. समस्यांसाठी नागरिकांनी कित्येकदा पाठपुरावा केला. एकदा महापौर, आयुक्त आलेत. आश्वासन दिली, मात्र आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. नगरसेवकांना परिसरातील समस्या सोडवायला स्वारस्य नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.
आमच्या मोहल्ल्यापेक्षा गावखेड्यांतील रस्ते बरे !
By admin | Updated: May 15, 2016 00:07 IST