अंगणवाडीत नवा प्रयोग : आरोग्य सुदृढ करण्यावर भर अमरावती : अंगणवाड्यातील चिमुकल्यांसाठी सामाजिक बांधिलकीतून आता भाजीपाला फळे आणि धान्य वाटप करण्याचा ‘अक्षय पात्र’ उपक्रम सुरू केला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विकास विभागाने याकरिता पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात २ हजार ५०० अंगणवाड्या आहेत. सर्वच अंगणवाड्यांमधील पर्यवेक्षिकांना या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे. शेतातून भरघोस उत्पादन घेतल्यानंतर बाजारपेठेत पिकांची विक्री केली जाते. अनेकदा पिकांची नासाडी, तर काही वेळा उत्पादन अतिरिक्त होते. अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना दानशुराकडून सहकार्य मिळावे, असा अभिनव उपक्रम झेडपीच्या माध्यमातून राबविण्याचा मानस होता. त्यानुसार याची जिल्ह्यातील दीड हजार अंगणवाडी केंद्रात अंमलबजावणी सुरू केली आहे. पहिल्यांदाच घेण्यात येत असलेल्या या अभिनव उपक्रमाला प्रतिसाद लक्षात घेऊन हा नवा प्रयोग जिल्हाभरात टप्प्याटप्याने सर्वच अंगणवाडी केंद्रात सुरू केला जाईल. यापूर्वी अकोला झेडपीतर्फे अशा प्रकारचा ‘मुठभर धान्य’ हा अभिनव उपक्रम अंगणवाड्यांमध्ये राबविला होता. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाने अभिनव संकल्पना राबविण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतचा प्रस्ताव महिला व बालकल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ कैलास घोडके यांनी मांडली. या उपक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सद्या अंगणवाड्यांना विविध समस्यांनी घेरले आहे. वीज पुरवठा, जागा, छत, पाण्याची सोय नाही, अशा एक ना अनेक समस्यांनी अंगणवाड्यांमधील चिमुकलेही त्रस्त आहेत. १४ पंचायत समित्यांमधील अंगणवाड्यांमध्ये ‘अक्षय पात्र’ उपक्रम सुरु केला आहे. चिमुकल्यांना पौष्टिक आहार मिळणार असून आपुलकीची भावना निर्माण होत आहे. तयार आहार खरेदी करण्यापेक्षा शेतातून उत्पादीत झालेल्या ताजा भाजीपाला, फळ आणि धान्य चिमुकल्यांना दिल्यास आरोग्य सुदृढ असेल, असा या मागील उद्देश आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडीसेविका व पर्यवेक्षिकांचाही सत्कार केला जाणार आहे. (प्रतिनिधी)अक्षय पात्र योजनेतून अंगणवाडीतील चिमुकल्यांना दिल्या जाणारा पोषण आहार पौष्टिक राहील. बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी महिला बालकल्याण विभागाचा हा नवा प्रयोग लोकसहभागातून राबविण्याचा विचार आहे. - वृषाली विघे , सभापती, महिला व बाल कल्याणसमिती
चिमुकल्यांना ‘अक्षय पात्रातून’ लाभ
By admin | Updated: August 4, 2016 00:06 IST